जिल्हाभरात ड्रग्जविरोधी मोहीम राबविणार ,जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा निर्धार

Spread the love

पोलिस आणि जिल्हा प्रशासनालाही दिले निर्देश 

तुळजापूर शहर आणि परिसरातून ड्रग्ज हद्दपार झाला आहे. तुळजापूरात ज्या पद्धतीने काही नागरिकांचे सहकार्य घेऊन हे विष उखडून टाकण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या मदतीने मोहीम राबविली अगदी तशीच व्यापक मोहीम जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने जिल्हाभरात युवकांच्या सहकाऱ्यांने राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला तशा सूचनाही दिल्या आहेत. जिल्ह्यातील युवकांना सजग होऊन ड्रग्जविरोधी मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

जागतिक युवा दिनी जगभर युवकांना उध्वस्त करणाऱ्या या विषारी धंद्या विरुद्ध लढा देण्याची जबाबदारी आम नागरिकांनी देखील स्वीकारायला हवी. तुळजापूर शहर आणि परिसरात सुरू असलेला हा प्रकार मुळातून उखडून टाकण्यासाठी आपण नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले होते. मिळालेल्या माहिती पोलीस प्रशासनाला देऊन सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी संबंधित नागरिकांसह त्यांची यंत्रणा कामाला लावून मोठी कारवाई केली आणि आता तुळजापुरातून हा सगळा धंदा हद्दपार झाला आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीमुळे हे सगळे घडून आले. आता जिल्ह्यातील अन्य ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत. 

प्रत्येक महाविद्यालयात अँटी नार्कोटिक्स क्लब स्थापन करण्यात येत आहे व त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे व ते लवकरच याचा आढावा घेतील. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत सजग पालकांनाही सहभागी करून घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. 

जिल्हाभरातील युवक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांपर्यंत या मोहिमेच्या माध्यमातून अत्यंत संवेदनशील पद्धतीने माहिती पोहचवली जाणार आहे. या विषारी व्यसनाचे दुष्परिणाम किती घातक आणि दीर्घकालीन आहेत याबाबत प्रभावीपणे जाणीव जागृतीही केली जाणार आहे. शिक्षण, साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ञांचे सहकार्य घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने जिल्हाभरात पथनाट्य पथकाच्या माध्यमातून ड्रग्जविरोधी मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. 

या विषारी गोरख धंद्याबद्दल ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध आहे, अशा सजग आणि कर्तव्यदक्ष नागरिकांनी आपल्याकडे अथवा पोलीस प्रशासनाकडे याबाबतची माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांशी याबाबत सविस्तर बोलणे झालेले आहे. या व्यापक ड्रग्जविरोधी मोहिमेत सहभागी होऊन तक्रार नोंदविण्यासांबधी स्वतंत्र संपर्क क्रमांक पोलिस यंत्रणेकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे. ही सगळी प्रक्रिया गोपनीय असणार आहे. त्यामुळे निर्धास्तपणे आपल्या जिल्ह्यातून या विषारी धंद्याचे मुळासकट उच्चाटन करण्यासाठी नागरिकांनी न डगमगता या ड्रग्जविरोधी मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!