धाराशिव :
शिंगोली आश्रम शाळेत ९ ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत भिसे पाटील, विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण, पर्यवेक्षक रत्नाकर पाटील, आदर्श प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत भिसे पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.
इंग्रज व्यापारी म्हणून आले व राज्यकर्ते बनले. तोडा, फोडा, झोडा व राज्य करा हे धोरण वापरून इंग्रजांनी भारतात सत्ता मिळवली व सुमारे दीडशे वर्ष राज्य केले. इंग्रजांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळत नव्हता. परंतु सन १८५७ च्या उठावानंतर मंगल पांडे यांच्या बलीदानामुळे व राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्यामुळे “मेरी झांसी नहीं दूंगी” या गर्जनेमुळे, क्या खूब लड़ी वो मर्दानी, झांसी वाली रानी थी या ओळखीमुळे उठावाची लाट उसळली.
लाल, बाल, पाल म्हणजेच लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपीनचंद्र पाल यांच्या मुळे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. शिवजयंती व गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले. राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार, स्वदेशीचा वापर यांचा अंगीकार लोकांना करावयास लावला. केसरी वृत्तपत्रातून इंग्रजांविरुद्ध टिकेची झोड उठवली.
पंजाबमध्ये इंग्रजांच्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय जखमी झाले व मृत्यूमुखी पडले. ही घटना क्रांतिकारक भगतसिंगांना पटली नाही. या घटनेचा बदला घेण्यासाठी भगतसिंगांनी “खून का बदला खून” या धर्तीवर बंदूक व बॉम्बचा वापर करून क्रांतिकार्याला सुरुवात केली आणि हसत हसत भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी फासावर चढले.
“तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा” हा नारा देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय तरुण व तरुणींना हिंदवी फौजेत भरती करून घेतले. जर्मनी व जपान यांच्या मदतीने भारतीय तरुणांना “चलो दिल्ली” हा नारा दिला. उत्तर प्रदेशात चित्तू पांडे व महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापन केले.
आजी शेवटचे श्वास मोजत असताना व घरा भोवती इंग्रज सैन्याचा वेढा असताना, आजीच्या मृत्यूनंतर तिच्या तिरडीवर झोपून जिवंतपणे अंत्ययात्रा काढणारे व मुखाग्नी देताच नदीत उडी टाकून पसार झालेले क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या साहसामुळे देशात संपूर्ण इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण झाली.
विद्यार्थी, मजूर, कामगार, शेतकरी, महिला — सर्वच भारतीय स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी “करा किंवा मरा” हा मंत्र दिला व इंग्रजांना “भारत छोडो, चले जाव” असा नारा दिला. तेथून पुढे भारतीय स्वातंत्र्यदिनाची मंगल पहाट उजाडली.