धाराशिव (प्रतिनिधी) – शहरात खुलेआम गुटखा विक्रीचे सत्र सुरूच असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. धाराशिव शहर पोलीस ठाण्याने १२ जुलै २०२५ रोजी दोन विक्रेत्यांकडून १,०४,४१४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू जप्त केला.
ही कारवाई श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील महाराष्ट्र किराणा दुकान, तुळजापूर रोड येथे करण्यात आली. आरोपींची नावे सलमान उर्फ जाकीर तांबोळी (रा. समता कॉलनी, धाराशिव) आणि दत्तात्रय पांडुरंग कामठेकर (रा. समता नगर, धाराशिव) अशी असून, त्यांच्याविरुद्ध कलम 123, 223, 274, 275 भा.दं.वि. व अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 चे कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शहरातील शाळा, सार्वजनिक ठिकाणे आणि गल्लीबोळांतून सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत आहे.
नागरिकांनी असा आक्रोश व्यक्त केला आहे की, “छोट्या छोट्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करून फारसा परिणाम होत नाही. गुटखा पुरवणारे मोठे डीलर व साठेखोर यांच्यावर थेट व कठोर कारवाई केल्यासच गुटखा विक्रीला आळा बसेल,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.