घाटंग्री (धाराशिव) | प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाटंग्री येथील मुख्याध्यापक विद्यानंद गोपाळराव पाटील यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडला. त्यांच्या यशस्वी कार्यकाळाच्या समारोपप्रसंगी एक हळव्या भावनांचा आणि कृतज्ञतेचा क्षण गावकऱ्यांनी अनुभवला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू शिंदे (शिक्षणविस्तार अधिकारी, धाराशिव) होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून हरिभाऊ बनसोडे (निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, धाराशिव) यांनी उपस्थिती लावली. शाळेतील शिक्षकांच्या वतीने पाटील सरांचा सपत्नीक भर आहेर, शाल, हार व पुष्पगुच्छ देत सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी आपापले मनोगत व्यक्त करत पाटील सरांच्या आपुलकीच्या स्वभावा, हसतमुख वर्तणुकीच्या आठवणी जागवल्या. त्यांनी अनेक कठीण प्रसंगातून सहकाऱ्यांना मार्ग दाखवला, असे बोलताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले.
आपल्या मनोगतात पाटील सरांनी म्हटले, “हरिभाऊ सरांचे मार्गदर्शन व संपूर्ण गावाचे पाठबळ हेच माझ्या यशाचे कारण आहे. मला कधीच एकटं वाटलं नाही, प्रत्येक क्षणी मला हत्तीचे बळ मिळाले.”
बापू शिंदे सरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत सहकुटुंब आनंदी आयुष्य जगावे, असा संदेश दिला. हरिभाऊ बनसोडे सरांनी पाटील सरांचे योगदान व त्यांच्या विद्यार्थ्यांचे यश हेच त्यांच्या कार्याची खरी पावती असल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्रीमती वाघमारे मॅडम, प्रदीप तांबे, पांडुरंग तनमोर, अरुण खराडे, विक्रम लोमटे, राहुल भंडारे, घाटंग्री आश्रम शाळेचे मुख्याध्यापक माने सर, आदर्श विमुक्त जाती आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार तसेच गावातील शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.