धाराशिव (दि. २८ जून) – महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधीत जर्दा यांचा साठा करून विक्री करणाऱ्या इसमावर धाराशिव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक शकील एस. शेख हे २८ जून रोजी पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे हजर असताना त्यांना माहिती मिळाली की, बालाजी नगर, धाराशिव येथे राहणारा प्रशांत पांडुरंग टेळे हा त्याच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि पान मसाला विक्री करीत आहे.
ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ अधिनस्त अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले. १२:३५ वाजता पोलिसांनी पंचासह सदर ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी आरोपी प्रशांत टेळे हा प्रत्यक्ष विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता, खालीलप्रमाणे मुद्देमाल सापडला:
डायरेक्ट पान मसाला – एकूण ४२ बॉक्स (किंमत: ₹१०,५००/-)
सुगंधीत जर्दा (लाल व पिवळ्या रंगाचे पाऊच) – एकूण १९० पाऊच (किंमत: ₹२८,५००/-)
असा एकूण ₹३९,०००/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक रितू खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक शाफकत आमना, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, आणि पोलीस निरीक्षक शकील एस. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदिप ओहोळ, पोलीस हवालदार राशीद पठाण, नामदेव जाधव, महिला पोलीस हवालदार अम्रपाली पाटील, व पोलीस अंमलदार सुधीर मुगळे यांनी संयुक्तपणे केली.