२७ जून ते १० जुलै दरम्यान धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी लागू – कायदा सुव्यवस्थेसाठी महत्त्वाचा निर्णय
—
धाराशिव | दि. २६ जून ( अंतरसंवाद न्यूज )
धाराशिव जिल्ह्यात २७ जून २०२५ पासून १० जुलै २०२५ पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने हे आदेश जारी केले असून, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१)(३) अंतर्गत ही बंदी लागू करण्यात आली आहे.
या कालावधीत कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलन, उपोषण, मिरवणुका, रास्ता रोको, शस्त्रधारण, घोषणाबाजी, पाच किंवा अधिक लोकांचा जमाव, तसेच प्रक्षोभक भाषणे यावर बंदी घालण्यात आली आहे.
मात्र, अंत्ययात्रा, लग्न समारंभ, धार्मिक विधी, तसेच शासकीय कार्यक्रम यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे अनिवार्य आहे.
हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी २६ जून रोजी जारी केला आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.