धाराशिव | दिनांक – २७ जून २०२५
धाराशिव नगरपालिकेत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशासकीय व कार्यक्षमतेच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर, तुळजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्याकडे आता धाराशिव नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
आज दिनांक २७ जून रोजी रणदिवे यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त त्रिंबक डेंगळे यांनी दिली.
यापूर्वी हरी कल्याण येलगटे यांच्या जागी वसुधा फड यांनी मुख्याधिकारीपदाचा कार्यभार घेतला होता. मात्र त्यांच्या कार्यकाळातही नागरिकांनी अस्वच्छता, पाणीटंचाई, खराब रस्ते, व निकृष्ट दर्जाच्या विकासकामांबाबत तक्रारी केल्या. वसुधा फड सध्या वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत होती.
धाराशिव नगरपालिकेत गेल्या काही काळात विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचे आरोप सातत्याने होत असून, अनेक प्रकल्प निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
अजिंक्य रणदिवे यांच्याकडून नागरिकांना आता प्रशासनात पारदर्शकता व कार्यक्षमतेची अपेक्षा आहे.