येवला | अंतरसंवाद न्यूज प्रतिनिधी
महाराष्ट्रातील एक महत्त्वाची रेल्वेगाडी असलेली कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आता सुधारित एलएचबी (लिंक हॉफमन बुश) डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. या बदलामुळे विशेषतः येवला व आसपासच्या भागांतील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुखकर आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
प्रवाशांच्या मागणीला मिळाला सकारात्मक प्रतिसाद
या गाडीमध्ये पूर्वी १० स्लीपर डबे होते. एलएचबी डबे लागू करताना ही संख्या थेट २ करण्याच्या प्रस्तावावर प्रवाशांनी आक्षेप घेतला होता. यानंतर प्रवाशांच्या मागणीला मान देत रेल्वे मंत्रालयाने स्लीपर डब्यांची संख्या ७ ठेवून त्यांचे एलएचबीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बर्थची एकूण संख्या जवळपास पूर्वीइतकीच राखण्यात आली आहे.
नवीन डब्यांची रचना:
१ द्वितीय वातानुकुलित (AC 2-Tier) कोच
४ तृतीय वातानुकुलित (AC 3-Tier) कोच
७ शयनयान (Sleeper) कोच
४ सामान्य द्वितीय श्रेणी कोच
१ अतिरिक्त सामान्य कोच
१ जनरेटर कार
या नव्या एलएचबी डब्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते वजनाने हलके, मजबूत आणि गतीक्षम आहेत. तसेच डब्यांमध्ये स्वच्छ स्वच्छतागृहे, चांगले वेंटिलेशन आणि आरामदायी आसन व्यवस्था उपलब्ध आहे.
प्रवास आता अधिक आरामदायी आणि सुरक्षित
या सर्व डब्यांचे एलएचबीमध्ये रूपांतर केल्याने गाडीच्या गतीत वाढ, अपघातांचा धोका कमी, आणि प्रवाशांसाठी जास्त सोयीस्कर व स्थिर प्रवास शक्य होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण व निमशहरी भागांतील प्रवाशांचा प्रवास अधिक समाधानकारक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
येवला व मतदारसंघातील प्रवाशांसाठी विशेष लाभ
या बदलामुळे येवला व इतर लहान स्टेशनांहून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे. अनेक वर्षांपासून एलएचबी कोचची मागणी सुरू होती. आता ती प्रत्यक्षात आल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.