धाराशिव : शहरातील खाजा नगर व दर्गा परिसरात मोकाट कुत्रे व जनावरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून यावर तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा समाजसेवक असलम सय्यद यांनी दिला आहे. अंतरसंवाद न्यूज / उस्मानाबाद न्यूजशी बोलताना त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
या भागात यापूर्वीही नागरिकांनी आंदोलन करून निवेदन दिले होते, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.
दर्गा परिसरात कुत्र्यांचा हैदोस सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी दहा वर्षांच्या मुलावर कुत्र्यांनी हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. “माझ्या घरातील शेळ्या कुत्र्यांनी फाडल्या आहेत,” अशी माहिती स्थानिक रहिवासी अमजद शेख यांनी दिली.
या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत प्रशासनाने त्वरीत कुत्रे आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन तीव्र आंदोलन उभे राहील, असा इशारा देण्यात आला आहे.