धाराशिव | प्रतिनिधी
श्रद्धा आणि नियतीच्या अद्भुत संगमाचा प्रत्यय देणारी घटना नुकतीच लिबियातील आमेर अल-महदी मन्सूर अल-गद्दाफी या हज यात्रेकरूच्या आयुष्यात घडली. सुरक्षेच्या कारणास्तव विमान प्रवासासाठी रोखण्यात आलेल्या आमेरला, विमानतळावरून तिसऱ्यांदा परतवण्यात आलेल्या विमानातून अखेर हज यात्रेसाठी रवाना होता आले. ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून जगभरातून त्याचे कौतुक होत आहे.
“ज्याला अल्लाह बोलावतो, त्याला कोणीही थांबवू शकत नाही!”
आमेरच्या प्रवासावर ही ओळ अक्षरशः लागू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आमेरला हज यात्रेसाठी सऊदी अरेबियाला जाणे आवश्यक होते. मात्र, विमानात चढण्यापूर्वीच सुरक्षेच्या कारणास्तव त्याला अडवण्यात आले. विशेष म्हणजे, तीन वेळा विमान थांबवून अखेर वैमानिकाने स्वतः हस्तक्षेप करत, “जो प्रवासी थांबवण्यात आला आहे, त्याला विमानात प्रवेश द्या,” असे सांगितले. ही बाब ऐकून उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
जेद्दाहमधील किंग अब्दुलअझीज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आमेर आणि इतर लिबियन यात्रेकरूंचे लिबियाच्या हज मिशन प्रमुख अली अल-बशीर आणि वाणिज्यदूत अब्दुल रज्जाक मेनफी यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. आमेरचा आनंदी चेहरा आणि स्वागत सोहळा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
ही घटना ‘जर काही आपल्या नशिबात असेल, तर ते कोणत्याही अडथळ्यावर मात करून आपल्यापर्यंत पोहोचते’ या श्रद्धेच्या संदेशाचे प्रतीक ठरली आहे.