धाराशिव नगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएमची जोरदार तयारी; नासिर सिद्दिकी यांची जिल्हा पर्यवेक्षक पदी नियुक्ती

Spread the love

धाराशिव – राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमने (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन) जोरदार तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नव्याने सुरू होणाऱ्या निवडणुकांसाठी पक्षाकडून संघटनात्मक पातळीवर नियोजन आखले जात आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीनगरचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा निवडणुकीचे उमेदवार नासिर सिद्दिकी यांची धाराशिव जिल्ह्यासाठी जिल्हा पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती माजी खासदार तथा एमआयएम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून, धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकसंघ करत मजबूत भूमिका बजावण्याचा उद्देश आहे. सिद्दिकी यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा लाभ जिल्ह्यातील संघटनेला होईल, असा विश्वास पक्षात व्यक्त केला जात आहे.

मागील निवडणुकांदरम्यान काही निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, सिद्दिकी यांच्या नियुक्तीनंतर अशा कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळेल आणि पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांतून उमटत आहे.

नवीन नियुक्तीनंतर नासिर सिद्दिकी लवकरच धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार असून, ते विविध तालुक्यांतील पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. पक्ष संघटनेला बळकट करण्याबरोबरच आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे.

यासंदर्भात एमआयएमचे माजी जिल्हा प्र. अध्यक्ष मुस्तफा खान आणि जाफर मुजावर यांनी माहिती देताना सांगितले की, “सिद्दिकी साहेबांची ही नियुक्ती पक्षासाठी फायदेशीर ठरणार असून, त्यांच्या नेतृत्वात धाराशिव जिल्ह्यात एमआयएमचे जाळे अधिक मजबूत होईल.”


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!