धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील खिरणी मळा भागामध्ये सुरू असलेले रस्ते व नालीचे काम पूर्णतः निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी लहुजी वस्ताद चौकाजवळ नालीवर टाकलेला स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे या भागातील कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या भागातील नागरिकांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही. उलट या परिसरामध्ये निकृष्ट दर्जाचे काम सुरूच असून, त्याचे परिणाम आता प्रत्यक्ष पाहायला मिळत आहेत.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्याच्या बांधकामात खडीऐवजी मातीचा वापर होत असल्याचे प्रकार घडत असून, संबंधित कामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून, लवकरच आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.
प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.