धाराशिव 🙁 प्रतिनिधी)
तीर्थक्षेत्र तुळजापूर पुन्हा एकदा अवैध धंद्यांच्या विळख्यात सापडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहराच्या प्रतिष्ठित अशा ‘एसपींच्या स्पेशल टीमचा ‘मलबा हाइट्स’ लॉजवर थेट पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत एका स्वतःला नगराध्यक्ष नगरसेवकाचे डोहाळे लागलेले अमोल कुतवळ,भाजपाचे बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील,विनोद गंगणे यांचा मोठ्या मटका अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. यांच्या सह ३३ जनाची नावे गुन्हा नोंद झाला आहे.या कारवाईत मटका बुकी चालवणारा नाईकवाडी यास ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मटका, जुगार, चक्री जुगार यांसारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू होते. स्थानिक पोलिसांच्या कथित आशीर्वादानेच हे गोरखधंदे फोफावत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. यामुळे ‘आई तुळजाभवानी’च्या नावाने ओळखली जाणारी ही पवित्र नगरी आता अवैध धंद्यांचे ‘माहेरघर’ बनू लागली होती. काही काळापूर्वी ड्रग्ज प्रकरणामुळे बदनाम झालेल्या तुळजापूरच्या प्रतिमेला या नव्या प्रकरणामुळे आणखी एक डाग लागला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर त्यांच्या विशेष पथकाने ही धाडसी कारवाई केली. ”मलबा हाइट्स”मध्ये मोठ्या प्रमाणावर कल्याण मटका नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान, मटका किंग म्हणून ओळखला जाणारा नाईकवाडी हा रंगेहाथ पकडला गेला. या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, या अवैध धंद्यांना अनेक राजकीय पुढार्यांचा वरदहस्त असल्याचीही चर्चा आहे. अनेक राजकीय नेते आणि त्यांचे कार्यकर्ते या मटका बुकींच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर या प्रकरणामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात, एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेला हा गोरखधंदा स्थानिक पोलिसांच्या नजरेतून कसा काय सुटला? की याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते? असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत. एसपींच्या विशेष पथकाला थेट कारवाई करावी लागल्याने स्थानिक पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची या प्रकरणात संलिप्तता असल्याचा संशय बळावला आहे.
या कारवाईनंतर तुळजापूरकरांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या कारवाईचे स्वागत केले असून, अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी, अशा कारवाया केवळ दिखाव्यापुरत्या न राहता, यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली आहे.
आता या प्रकरणात पुढे काय काय उघडकीस येते, कोणत्या राजकीय व्यक्तींची नावे समोर येतात आणि पोलीस या अवैध धंद्यांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यशस्वी होतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.