जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांची संकल्पना , तृतीयपंथीय व्यक्ती चालविणार आपले सरकार सेवा केंद्र….!

Spread the love

धाराशिव दि.4 मे / तृतीयपंथीय व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याच्या दिशेने जिल्ह्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथी व्यक्तीकडून चालविल्या जाणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन  पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात  करण्यात आले.

तृतीयपंथीय व्यक्तींना कायदेशीर ओळख,सामाजिक संरक्षण,मानवी हक्कांचे रक्षण आणि शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत, धाराशिव जिल्ह्यातील आकाश ऊर्फ देवांशी प्रकाश काकडे या तृतीयपंथीय व्यक्तीस ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालविण्याची संधी देण्यात आली आहे.

कार्यक्रमास जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक संजय जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.बाबासाहेब अरवत,तसेच तृतीयपंथीय प्रतिनिधी श्रीमती माया दाम (पानसे) आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींना सशक्तीकरण, स्वावलंबन व सन्मानाने जीवन जगण्याची संधी प्राप्त होणार असून, इतर जिल्ह्यांसाठीही हा एक प्रेरणादायक आदर्श ठरणार आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!