तुळजापूर बसस्थानकासारखी सुसज्ज बसस्थानक राज्यात सर्वत्र उभारणार : पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची ग्वाही

Spread the love

धाराशिव | ३० एप्रिल २०२५
आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर माझ्या हस्ते तुळजापूर येथील नव्या बसस्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन होणे, हे माझं भाग्य आहे. अशाच प्रकारची सुसज्ज आणि आधुनिक बसस्थानकं संपूर्ण राज्यात उभारण्याचा आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री, एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाच्या नव्याने उभारलेल्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमास आमदार राणाजगजीतसिंह पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, एस.टी. नाशिक विभागाच्या उपमहाव्यवस्थापक अमृता ताम्हणकर आणि विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्यभर सुसज्ज सेवा देण्याचा निर्धार
“मंत्री झाल्यापासून मी एस.टी.ने प्रवास करताना प्रवाशांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या. दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी एस.टी. सेवेचा लाभ घेतात. या प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेवर सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नव्या बसस्थानकांमध्ये स्वच्छ प्रसाधनगृहे, सुसज्ज प्रतीक्षालये आणि देखभाल यंत्रणा महत्त्वाची ठरेल,” असे सरनाईक म्हणाले.

१०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय लवकरच सेवा देणार
सरनाईक यांनी यावेळी जाहीर केले की, श्री. तुळजाभवानी ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर येथे १०० खाटांचे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार असून, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत इंग्लंडमध्ये मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे.

बसस्थानकांना शिवछत्रपतींची नावे
“छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे प्रेरणास्थान आहेत. तुळजापूर आणि धाराशिव येथील बसस्थानकांना त्यांच्या नावाने ओळख दिली जाईल,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

कार्यक्रमास अनेक नागरिक, प्रवासी, आणि एस.टी. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!