फलोत्पादन क्षेत्र वाढविण्यासाठी मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव ग्रामसभेत घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Spread the love

धाराशिव (ता. 30 एप्रिल 2025 ) – जिल्ह्यातील हवामान फळबाग लागवडीस अत्यंत अनुकूल असून, शेतकऱ्यांनी फळपिके घेतल्यास आर्थिक उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना पत्र पाठवून १ मे २०२५ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मग्रारोहयो (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत फळबाग लागवडीस इच्छुक शेतकऱ्यांचे ठराव मंजूर करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत मग्रारोहयो, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, नामांतर्गत डोंगराळ व अनुसूचित क्षेत्रांत फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी ग्रामसभेच्या ठरावात त्यांची नावे समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, ग्रामसभेत मंजूर करण्यात आलेली नावे पुढील लेबर बजेटमध्ये समाविष्ट केल्यास रोजगार निर्मितीसह फलोत्पादन क्षेत्रात वाढ साधता येईल. शेतकऱ्यांच्या अर्थिक उन्नतीसाठी ही संधी अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहून आपल्या नावाचा ठरावात समावेश होत आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!