रस्त्यांच्या कामासाठी आणि कचरा डेपो स्थलांतरासाठी धाराशिवमध्ये आमरण उपोषण सुरू

Spread the love

धाराशिव, ता. 28:
धाराशिव शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे व कचरा डेपो स्थलांतराच्या मागणीसाठी अखेर आमरण उपोषण सुरू झाले आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन बळी गेल्याचे तसेच नागरिक विविध आजारांनी त्रस्त असल्याचे चित्र असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सोमनाथ गुरव, युवा सेना शहरप्रमुख रवी वाघमारे आणि काँग्रेसचे जिल्हाव्यवस्थापक व प्रसिद्धीप्रमुख सरफराज काझी यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी खासदार पवन राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

रस्त्यांची कामे रखडल्याने यापूर्वीही अनेकदा आंदोलने झाली आहेत. जानेवारी महिन्यात नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने 28 फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे आहे.

नगरोत्थान महाअभियानांतर्गत धाराशिव नगरपालिकेला 140 कोटी रुपये खर्चाच्या 59 डीपी रस्त्यांच्या कामांना 23 फेब्रुवारी 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. नियमांनुसार सात दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून तीन महिन्यांत काम सुरू करणे बंधनकारक आहे. तरीही अद्याप काम सुरू झालेले नाही.

कचरा डेपो स्थलांतराच्या मागणीसाठी देखील यापूर्वी अनेक आंदोलने झाली आहेत. कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि आजारांचे प्रमाण वाढले असून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबतची गंभीरता प्रशासनाने दुर्लक्षित केल्याने उपोषणकर्त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सायंकाळी नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी पवार साहेब यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण न थांबवण्याचा ठाम निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. अशी प्रतिक्रिया– सोमनाथ गुरव, शहरप्रमुख, ठाकरे सेना यांनी दिली आहे.



Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!