पुणे | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चिंता निर्माण केली आहे. या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे अपयश समोर आले असून, केंद्र शासन यावेळेस देखील गाफील राहिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले, “पुलवामा हल्ला, संसदेवरील हल्ला, मुंबईतील दोन्ही हल्ले आणि हैदराबादमधील हल्ल्यावेळी जसे शासन गाफील राहिले, तसेच यावेळीही ते गाफील राहिले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “सरकारने हे ठरवणे गरजेचे आहे की, ज्या ताकदीने ते नक्षलवाद्यांच्या मागे लागले आहेत, त्याच ताकदीने आंतकवाद्यांच्या पाठीमागे का लागत नाहीत?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर असून, हल्ल्याची सखोल चौकशी आणि जबाबदारी निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणीही त्यांनी केली.