पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, राज्य सरकारने तत्काळ मदतीचे पावले उचलली आहेत.
या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. तसेच या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक सुखरूप परत यावेत यासाठी राज्य सरकारकडून एक विशेष विमान पाठवण्यात येणार आहे. या विमानाचा संपूर्ण खर्च राज्य शासन उचलणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकार या संकटाच्या काळात पीडित कुटुंबांसोबत असून, त्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.