तुळजापूर (ता. १७ एप्रिल) : उन्हाळ्याच्या तडाख्यात झळा सोसणाऱ्या पक्षी व वन्यप्राण्यांसाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर कॅम्पस येथे एक स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील ५ ठिकाणी वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या टाक्या, तर ५ ठिकाणी पक्ष्यांसाठी चार व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रो. बाळ राक्षसे कॅम्पस संचालक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या अशा प्रकारच्या उपक्रमांची नितांत गरज आहे. मानवी हस्तक्षेपामुळे हरवत चाललेली जैवविविधता, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, पक्षी व वन्यजीव संरक्षणासाठी हे छोटे पण प्रभावी पाऊल दिशादर्शक ठरणार आहे.
याप्रसंगी प्रो. रमेश जारे, डॉ. संपत काळे, डॉ. नीलम यादव, श्री. गणेश चादरे, श्री. देविदास कदम, श्री. शंकर ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाची संकल्पना श्री. सचिन भालेकर यांची असून त्यांनी यासाठी अथक मेहनत घेतली आहे. या उपक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सक्रिय योगदान देत आहेत.