धाराशिवकरांची हक्काच्या उद्यानासाठी प्रतीक्षा कायम; लाखो रुपये खर्च, पण स्थिती जैसे थे – आमदार, खासदार, विरोधकांचे राजकारण?

Spread the love


धाराशिव : शहरातील नागरिक आजही एका स्वच्छ, सुरक्षित आणि सुसज्ज उद्यानासाठी प्रतीक्षेत आहेत. शहरात काही ठिकाणी उद्याने असली तरी ती वापरण्यायोग्य स्थितीत नाहीत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विरंगुळ्यासाठी शहरात एकही नीट व्यवस्था नाही, याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहराची लोकसंख्या सध्या दीड ते दोन लाखांच्या दरम्यान आहे. एवढ्या मोठ्या नागरी समुदायासाठी सार्वजनिक आरोग्य, व्यायाम आणि मनोरंजनासाठी आवश्यक असलेल्या सोयी अपुऱ्या पडत आहेत. विशेष म्हणजे, शहरात अनेक ठिकाणी मोकळ्या व प्रशस्त जागा असतानाही त्यांचा नियोजनबद्ध वापर उद्यानांसाठी होताना दिसत नाही.


गेल्या काही वर्षांत विविध उद्यानांसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखवले गेले. मात्र प्रत्यक्षात या कामांचा कुठेही ठोस परिणाम जाणवत नाही. बहुतांश ठिकाणी सुरक्षण भिंतीचे अर्धवट काम , अस्वच्छ परिसर आणि उघड्यावर कचरा — हीच स्थिती पाहायला मिळते. त्यामुळे “उद्याने केवळ कागदावरच उभी आहेत,” असा आरोप विरोधकांनी केला आहे. काही सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी या ठिकाणी अगोदरच खर्च झाला आहे तर त्यामुळे नव्याने मंजूर झालेली कामे दुसऱ्या ठिकाणी होणार असल्याचे सांगितले व खरी माहिती जनतेसमोर आली पाहिजे असे प्रतिक्रिया दिली आहे . तत्कालीन नगराध्यक्षांच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.



2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान धाराशिव शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरी सुविधा हे प्रमुख मुद्दे ठरले होते. अनेक सत्ताधारी नेत्यांनी व विरोधकांनी पत्रकार परिषदांमधून उद्यानांसाठी निधी आणल्याचे, लवकरच कामे सुरू होतील असे जाहीर केले होते. मात्र निवडणूक संपताच या विषयावर कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही. निवडून आलेले आमदारही या गोष्टीकडे लक्ष देणार आहेत का नाही हे सध्या तरी दिसून आलेले नाही!
धाराशिव शहरातील या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले, “शहरात फिरण्यासाठी, चालण्यासाठी एकही जागा नाही. आमच्यासारख्यांना रोज शहराबाहेर हातलादेवी व इतर ठिकाणी जावं लागतं, ही किती दुर्दैवी गोष्ट आहे!” महिलांचीही तक्रार आहे की, “मुलांना खेळायला घेऊन जाण्यासाठी एकही स्वच्छ आणि सुरक्षित जागा शहरात नाही. त्यामुळे घरातच राहण्याशिवाय पर्याय उरत नाही.”


फक्त विरंगुळ्यापुरते नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीनेही या उद्यानांचा अभाव गंभीर ठरत आहे. नियमित चालणे, व्यायाम यासाठी जागा नसल्यानं लठ्ठपणा, मधुमेह आणि रक्तदाबासारखे आजार वाढत असल्याचे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे आहे.

नागरिक आता स्पष्टपणे म्हणत आहेत की, आश्वासनं पुरे झाली — आता कृती हवी. “उद्यानांचा मुद्दा निवडणुकीपुरता मर्यादित ठेऊ नका, तो आमच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे,” असा आवाज सध्या शहरभर उठताना दिसतोय.

सत्तेचा बगीचा फुलवण्यात मश्गूल राजकीय नेत्यांना शहरात उद्यान आहे का नाही याची जाणीव नाही. एकमेकांचे पाय ओढण्यात सगळेच नेते आणि जागतिक स्तरावरील कार्यकर्ते व्यस्त असल्याने उद्यान व्हावे असे कोणालाच वाटत नाही. उद्यान नसलेलं शहर म्हणून गिनिज बुकात नोंद झाली तर अरे व्वा व्वा आपल्या शहराची गिनिज बुकात नोंद झाली आणि त्याला आपण सकारात्मकतेने पहिले पाहिजे असे म्हणत हे नेते स्वतः ची पाठ थोपटून घ्यायला देखील कमी पडणार माहीत नाहीत अशीच प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

धाराशिवला नवीन “जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार” आले त्यांनी सर्व शहराची पाहणी केली  स्वच्छ ठेवण्याच्या सूचना दिल्या. पण नगरपालिकेकडून त्यांच्या सूचनाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. धाराशिव शहरात अनेक समस्या आहेत. बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक नागरिकांनी तक्रारी देखील दिल्या मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. परिस्थिती जैसे थे आहे. अधिकारी बदलले , सत्ताधारी बदलले , विरोधक बदलले , पुन्हा सत्ताधारी बदलले पण आरोप प्रत्यारोप याच्यापुढे काहीच नाही. आलेल्या नवीन जिल्हाधिकाऱ्यांकडे शहरवासीयांच्या नजरा लागल्या होत्या त्या देखील मावळताना दिसत आहेत.



धाराशिवकरांची एकच मागणी आहे — शहरात खर्‍या अर्थाने एक स्वच्छ, सुसज्ज आणि प्रत्यक्षात वापरण्यायोग्य उद्यान उभे रहावे.

#धाराशिव #उद्यानविकास #नगरविकास #सार्वजनिकसोयी #शहरविकास #नागरिकहक्क #राजकारण #सामाजिकसुरक्षा #धाराशिवकर


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!