धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 8 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन महिलांवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपडीत झोपलेल्या या दोघींना गावातील तीन तरुणांनी जबरदस्तीने झोपडीतून ओढत बाजूच्या शेतात नेले. तिथे त्यांच्यावर मारहाण करत लैंगिक अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर आरोपींनी पीडितांच्या झोपडीत आग लावून ती जाळून टाकली.
या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात 8 एप्रिल रोजी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम 70(1), 326(ग), 115(2), तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3(1)(w)(i)(ii), 3(2)(v) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत. या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
(टीप : पीडित महिलांची नावं आणि गाव गोपनीय ठेवण्यात आली आहेत.)