मंदिर-मस्जिद माणसाला माणूस बनविणारे कॉलेज – डॉ सय्यद पारनेरकर

Spread the love

संसद किंवा विधानसभेच्या सभागृहात विकासावर चर्चा होण्याऐवजी हिंदू-मुस्लिम… – आ.पाटील

ईद-ए-मिलाद कार्यक्रमास हिंदू लिंगायत मुस्लिम धर्म गुरुंची उपस्थित

धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) – हल्ली धर्मा-धर्मात आग लावून द्वेष पसरविण्याचे काम काही मंडळींकडून केले जात आहे. त्या माध्यमातून धर्माच्या नावावर राजकारण करीत करीत आहेत. परिणामी माणसातील माणूसपण विसरून चालले असून त्यासाठी मंदिर-मज्जिद आवश्यक आहेत. कारण डॉक्टरांना डॉक्टर बनण्यासाठी मेडिकल कॉलेज इंजिनिअर बनवण्यासाठी इंजिनिअरिंग कॉलेज वकील बनविण्यासाठी लॉ कॉलेज आहेत. अगदी त्याप्रमाणेच माणसाला माणूस बनवण्यासाठी मंदिर व मस्जिद हे कॉलेज असल्याचे प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांच्या गाथेचे गाढे अभ्यासक तथा प्रबोधनकार डॉ. रफिक सय्यद पारनेरकर यांनी केले.

धाराशिव शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्समध्ये रमजान ईद निमित्त जमात-ए-हिंद च्यावतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, हभप प्रकाश बोधले महाराज, लिंगायत धर्मगुरू तथा मठाधिपती कोरनेश्वर अप्पा स्वामी, सद्भावना मंचचे धर्मवीर कदम व जमात ए ईस्लाम हिंदचे शहराध्यक्ष सजीयोद्दीन शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ सय्यद पारनेरकर म्हणाले की, धर्माच्या नावाखाली आग लावायचे काम चालू आहे त्याला धर्म म्हणायचे का असे सांगत संत तुकाराम महाराजांच्या विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल… याप्रमाणे सर्वांनी आदर्श माणूस बनले पाहिजे. तर संत ज्ञानेश्वरांनी पसायदान व परिवर्तन हा रोजाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. जर आदर्श माणूस बनला तर कुटूंब आदर्श बनेल व त्या माध्यमातून समाज आदर्श होईल, हीच सर्व संतांची शिकवण असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हल्ली प्रत्येक धर्मांनी आपापले देव वाटून घेतले असले तरी प्रत्येकांनी मृत्यूचे स्मरण सतत केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. तर हभप बोधले महाराज म्हणाले की,‌ जन्म देणाऱ्या मातेची भाषाच पहिल्या प्रथम बालकाची मातृ भाषा बनते. त्यामुळे मानवाच्या उमलत्या जीवनाला फुलविण्याचे काम माता करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर समाजात धर्मगुरु काही काळानंतर असल्याने मातृ भाषेला प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सर्व धर्मांच्या संतांनी मानवता निर्माण केली आहे‌. तसेच ज्या राष्ट्राच्या महिला विकासाच्या प्रवाहात येत नाहीत, त्या राष्ट्राचा कधीच विकास होत नाही. विशेष म्हणजे समाजा समाजामध्ये जेव्हा द्वंद्व निर्माण होते. तेंव्हा ते निवारण्यासाठी संतच येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच धर्मगुरू स्वामी म्हणाले की, आज-काल सर्व धर्माचे धर्मगुरू आपापल्या धर्मात मग्न झालेले आहेत. त्यामुळे सामाजिक व्यवस्था काय आहे ? हे जाणण्याचे कोणीच काम करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. तर सुफी संतानीच लंगर प्रथा सुरू केली असून त्याची अंमलबजावणी पंजाबी लोक करतात. सुफी संतांनीच जाती जोडण्याचे काम केले असल्यामुळे मुस्लिमांनी सुफी संताचे काम वाढवावे असे आवाहन त्यांनी केले. मदरसामध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले जात आहे. मात्र हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये द्वेष पसरवून आग लावीत असल्याचे त्यांनी सांगितले. तर आ पाटील म्हणाले की, गेल्या दहा वर्षापासून विकासावर मते मिळविण्याऐवजी धर्माच्या नावावर मते मिळविण्याचे प्रकार सुरू असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. संसद किंवा विधानसभेच्या सभागृहात विकासावर चर्चा होण्याऐवजी हिंदू-मुस्लिम यावर कोणाला तरी वादग्रस्त वक्तव्य करायला लावायचे‌ आणि त्यावरच चर्चा करायचा असा प्रकार सुरू आहे ? विशेष म्हणजे
 आपल्या आजूबाजूला ज्या देशांमध्ये कट्टरता आहे त्या देशाचे आज हाल काय झाले आहेत ? असे सांगत १५ ते २० वयोगटातील युवकांना सर्व धर्माच्या संतांनीच योग्य दिशा देण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच कदम म्हणाली की, सर्व धर्माची शिकवण ही मानवतावादी असल्यामुळे धर्माधर्मात आपल्या राजकीय स्वार्थासाठी भांडणे लावणाऱ्यापासून सर्वांनी सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार गवारे यांनी तर सूत्रसंचालन साहेबलाल तांबोळी व  उपस्थितांचे आभार सजीयोद्दीन शेख यांनी मानले. यावेळी सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!