शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय वैद्यकीय संकुलाच्या बांधकामासाठी ४०३.८९ कोटींची प्रशासकीय मान्यता
जागतिक आरेाग्यदिनी राज्य सरकारची जिल्ह्याला भेट ः आमदार राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ४३० खाटांचे रूग्णालय व इतर अनुषंगिक इमारतींचे बांधकाम करण्यासाठी उच्चस्तरीय सचिव समितीने जानेवारीमध्ये घेतलेल्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने ४०३.८९ कोटी इतक्या रकमेच्या बांधकाम अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होवून नवीन जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे संकुल साकारले जाईल, दरम्यान जागतिक आरोग्यदिनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने धाराशिव जिल्ह्याला या माध्यमातून आनंदवार्ता दिली असल्याची भावना मित्र चे उपाध्यक्ष तथा भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली आहे. आहे.
राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार शहरातील जलसंपदा व कौशल्य विकास विभागाची १२ हेक्टर जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करून जागा वैद्यकिय शिक्षण विभागाकडे प्रत्यार्पित करण्यात आली आहे.या जागेवर सुसज्ज इमारत उभारण्यात येणार आहे. संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून इमारतीच्या उत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात आली आहे. त्याकरिता सुधारीत प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे दाखल करण्यात आला होता.
पुढील काळात राष्ट्रीय महामार्गालगतच असलेल्या शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयाकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त जागेत आयटीआय स्थलांतरीत होणार आहे आणि त्यानंतर आयटीआयच्या ठिकाणी वैद्यकिय शाखेशी निगडीत असलेले दंत महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, भौतिकोपचार शास्त्र, फार्मसी यासारखे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या शैक्षणिक संकुलाच्या बांधकामासाठी आता राज्य सरकारने ४०३ कोटी ८९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून आठ लाख २६ हजार चौरस फुट क्षेत्रावर बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये १०० विद्यार्थी क्षमता असणार्या मेडिकल कॉलेजची भव्य इमारत, ४३० खाटांचे रुग्णालय, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, अधिष्ठाता यांचे निवास, कर्मचार्यांसाठी निवासी घरे, विश्रामगृह, सुरक्षारक्षक कक्ष यांचा समावेश असणार आहे. अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे लवकरच निविदा प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. जागतिक आरोग्य दिनी हा महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत.
क्रिटिकल केअर मेडिसीन पदव्युत्तर अभ्यासक्रमासही मान्यता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे क्रिटिकल केअर मेडिसीन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. दरवर्षी दोन डॉक्टरांना प्रवेश घेऊन हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. त्यातून या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी धाराशिव वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात ३०० विद्यार्थी एमबीबीएसच्या विविध वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यामुळे धाराशिवने वैद्यकीय शिक्षणात एक पाऊल पुढे टाकले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यापूर्वी डीएनबी शल्यचिकित्सा शास्त्र व डी. एन. बी. स्त्री-रोग व प्रसुतीशास्त्र या विषयात प्रत्येकी दोन पदव्युत्तर जागांना मान्यता मिळाली आहे.