
तुळजापूर | धाराशिव जिल्ह्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनानिमित्त त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र, या दौऱ्यात त्यांच्या निवडणूकपूर्व आश्वासनांची आठवण करून देत आमदार कैलास पाटील यांनी त्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावर जाब विचारला आहे.
आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वचनाची आठवण करून दिली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. या घोषणेवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवत त्यांना भरभरून यश दिले, असे पाटील म्हणाले. मात्र, आतापर्यंत त्या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही.
“शेतकऱ्यांविषयी तुमचे प्रेम खरे असेल, तर तुम्हीच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यास वेळ का लावत आहात?” असा थेट सवाल करत, पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आई तुळजाभवानीच्या साक्षीने संपूर्ण कर्जमाफी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.
राजकीय वर्तुळात या प्रतिक्रियेची चर्चा रंगली असून, मुख्यमंत्री फडणवीस या विषयावर काय भूमिका मांडतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.