
धाराशिव – शहरातील स्वच्छतेची दयनीय अवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साचले असून, नालेसफाई व नियमित साफसफाईच्या अभावामुळे दुर्गंधी पसरली आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संताप वाढला आहे. दोन वर्षभरापासून शहरात स्वच्छतेचा तीन तेरा झाला आहे कोट्यावधी रुपये सूचनासाठी खर्च करून देखील शहरात स्वच्छता होत नाहीत अनेक तक्रारी दिल्यानंतर देखील कारवाई होत नाही.
तक्रारीनंतरही सुधारणा नाही
शहरातील मुख्य रस्ते, वसाहती, बाजारपेठा आणि अंतर्गत भागांमध्ये कचऱ्याचा उपद्रव वाढला आहे. पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले जात असून, प्रत्यक्षात शहरातील स्वच्छतेची स्थिती अत्यंत खराब आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही हरताळ
धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच नगरपालिका प्रशासनाला स्वच्छतेबाबत गंभीर सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र आहे. शहरातील काही ठिकाणी केवळ दिखाव्यासाठी साफसफाई करण्यात येत असून, अंतर्गत भागांमध्ये साफसफाई यंत्रणा ठप्प असल्याचे दिसत आहे. कागदपत्रे रोज स्वच्छता केली जात आहे.
नागरिकांचा संताप – आंदोलनाचा इशारा
शहरातील रहिवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही कर भरतो, पण स्वच्छतेच्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. प्रशासनाने त्वरित सुधारणा केली नाही, तर आम्ही आंदोलन करू,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
प्रशासन काय करणार?
या परिस्थितीवर जबाबदार अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. पालिकेच्या स्वच्छता विभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच नवीन जिल्हाधिकारी यांनी शहरात पाहणी करून जिल्हातील सर्व शहर स्वच्छता करण्याबाबत सूचना दिल्या होत्या मात्र त्याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
– धाराशिव प्रतिनिधी