सोलापूर : बार्शी तालुक्यातील सुर्डी गावात भरदिवसा जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकेत दरोड्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बार्शी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत अवघ्या तासाभरातच तिघा दरोडेखोरांना पिस्टलसह अटक केली. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून, नागरिकांतून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, चार ते पाच दरोडेखोर बँकेत घुसले आणि कर्मचाऱ्यांना धमकावत रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कोरफळे परिसरात संशयितांचा माग काढून पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि तिघांना अटक केली.
या मोहिमेत पोलीस हेड कॉन्स्टेबल अभय उंदरे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड, सागर शेंडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली.
सध्या अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी सुरू असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.