बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा गहिरा परिणाम होत असताना, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठविल्याचे सांगितले आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्यांनी आपल्या प्रकृतीची कारणे देत राजीनामा दिल्याचे सांगितले. “माझी प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसून, पुढील काही दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे मी मंत्रिमंडळातून राजीनामा देत आहे,” असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा थेट संबंध असल्याचा आरोप होत असून, त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याचा आग्रह धरला आहे.
या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र दाखल झाले आहे. न्यायालयीन चौकशी सुरू आहे. मी कुठलाही अन्याय सहन करणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, हीच माझी पहिली अपेक्षा आहे.”
राजकीय वर्तुळात या राजीनाम्यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात असून, आता पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.