धाराशिव – शहरातील ताजमहल थेटरजवळ आज (सोमवार) सकाळी सुमारे सात वाजता एका कपडे इस्त्रीच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. या आगीत दुकान संपूर्णपणे जळून खाक झाले असून, लागलेल्या आगीचा फटका जवळील एका जनावरांच्या गोठ्यालाही बसला आहे. या घटनेत काही जनावरे जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच धाराशिव नगरपरिषद अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अग्निशामक यंत्रणेची मर्यादा उघड
या घटनेत धाराशिव नगरपरिषदेच्या अग्निशामक यंत्रणेच्या मर्यादा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. शहरात एकच अग्निशामक गाडी असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अधिक वेळ लागला. शिवाय, गाडीतील पाणी संपल्यानंतर नव्याने पाणी भरून आणण्यासाठी विलंब झाला. परिणामी, आग पुन्हा भडकण्याच्या घटना घडल्या. नागरिकांनी नगरपरिषदेच्या अपुऱ्या साधनसुविधांबाबत नाराजी व्यक्त केली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक अग्निशामक गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.