धाराशिव : प्रभू रामचंद्रांच्या कुळात जन्मलेल्या व ज्यांच्या अथक प्रयत्नाने गंगा भारतभूमीवर अवतरली आणि आपला प्रदेश सुजलाम सुफलाम झाला. त्या राजा भगीरथाला आदर्श मानून वाटचाल करणार्या गवंडी समाजाचे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोठा हातभार आहे. अहोरात्र परिश्रम घेणार्या या वर्गाला दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना आखल्या आहेत, त्याचा सामान्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमास भाजपाचे जेष्ठ नेते सुनील चव्हाण,माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सतीश दंडनाईक, युवा नेते विनोद गंगणे, तुळजापूर बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, अॅड. दीपक आलुरे, वसंत वडगावे, प्रभाकर मुळे, प्रशांत लोमटे, अनिल बंडगर, प्रभाकर भोसले, दिनकर पाटील, अशोक शेळके, वैजीनाथ कोणाळे, बनसिद्धप्पा कोणाळे, शिवराज मरडे, विठ्ठल मरडे, विलास मरडे उपस्थित होते.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, राज्यात महायुती व देशात मोदींचे केंद्र सरकार देशहित आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहे. सरकारकडून गवंडी समाजासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मुलांंचे शिक्षण, पक्के घर बांधणी, मध्यान्ह भोजन योजना यांच्यासह राबविण्यात येणार्या इतर कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपले नियोनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन, उद्योग व शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करण्यासाठी आपण एक कालबद्ध कृती कार्यक्रम आखला आहे. पहिल्या टप्प्यात 10 हजार रोजगारनिर्मिती करण्याचा आपला निश्चय असून यासाठी आपली साथ गरजेची आहे.
सामाजिक सभागृहासाठी 10 लाख
किलज येथे गवंडी समाजबांधवांच्या विविध कार्यक्रम व उपक्रमांसाठी राजा भगीरथ सामाजिक सभागृहाची मागणी गवंडी समाजबांधवांनी केली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तातडीने त्यासाठी आमदार निधीतून 10 लाख निधी देण्याचे आश्वासन दिले.
बांधकाम कामगारांसाठी केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या प्रमुख योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
1. शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना
कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या विविध स्तरांवर शिष्यवृत्ती दिली जाते.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणापासून व्यावसायिक शिक्षणासाठी (ITI, इंजिनिअरिंग, वैद्यकीय) शिष्यवृत्तीची सुविधा.
2. गर्भावस्था आणि प्रसूतीसाठी सहाय्य
नैसर्गिक प्रसूतीसाठी ₹15,000 आर्थिक मदत.
शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी ₹20,000 पर्यंत सहाय्य.
3. गंभीर आजारांवरील उपचारासाठी मदत
हृदयविकार, कर्करोग, मूत्रपिंड विकार यांसारख्या गंभीर आजारांवर उपचारासाठी ₹1 लाखांपर्यंत आर्थिक मदत.
4. पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य
कामगारांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी ₹3 लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
5. अपघात विमा योजना
अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला ₹5 लाखांपर्यंत नुकसानभरपाई.
कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास ₹2.5 लाखांची मदत.
6. सामाजिक व कौटुंबिक मदत
कामगाराच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी ₹20,000.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत.
7. मुफ्त साधनसामग्री वितरण योजना
बांधकाम कामगारांसाठी आवश्यक साधनसामग्री (उदा. हेल्मेट, हातमोजे, सुरक्षात्मक साहित्य) मोफत दिले जाते.
8. मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत
बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी ₹51,000 आर्थिक सहाय्य.
9. आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे
मोफत आरोग्य तपासणी शिबिरे व औषधोपचार सेवा.
10. प्रवेश व नोंदणी प्रक्रिया सुलभ
बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी केल्यावरच योजनांचा लाभ घेता येतो. नोंदणीसाठी कामगारांना 90 दिवसांचे बांधकामाचे काम केल्याचा पुरावा आणि ओळखपत्र आवश्यक आहे.
अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी:
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
बांधकाम कामगार योजना वेबसाइट वर भेट द्या
या योजना बांधकाम कामगारांच्या जीवनमान सुधारण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.