धाराशिव (दि. 17 जानेवारी 2025) – तामलवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरज शांतीलाल देवकर (वय 35) यांना 50,000 रुपयांची लाच घेताना धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या घटनेने पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रकरणाचा तपशील:
तक्रारदाराविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात आरोपी देवकर यांनी तक्रारदाराला अटक न करण्यासाठी व गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी 1,00,000 रुपयांची मागणी केली होती. पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 50,000 रुपये स्वीकारताना आज पंचासमक्ष सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली.
सापळा कारवाईचे तपशील:
- लाच मागणी रक्कम: 1,00,000 रुपये
- लाच स्वीकारली रक्कम: 50,000 रुपये
- सापळा दिनांक: 17 जानेवारी 2025
सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष आरोपीने लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर परिणाम:
या प्रकरणामुळे पोलीस विभागाच्या प्रतिमेवर गंभीर डाग पडला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर केल्याने नागरिकांच्या मनात पोलीस दलाविषयी संशय निर्माण झाला आहे. कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणारेच भ्रष्टाचारात अडकले तर सामान्य नागरिकांचा विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सापळा कारवाईचे :
- सापळा अधिकारी: नानासाहेब कदम, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट
- सापळा पर्यवेक्षण अधिकारी: सिद्धाराम म्हेत्रे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट
- मार्गदर्शक अधिकारी: संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर
- सहकार्य: मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर
सापळा पथकात सिध्देश्वर तावसकर, आशीष पाटील, विशाल डोके, आणि शशिकांत हजारे आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा खाजगी व्यक्तीकडून लाचेची मागणी झाल्यास, त्वरित धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
- दुरध्वनी क्रमांक: 02472-222879
- टोल-फ्री क्रमांक: 1064
– अँन्टी करप्शन ब्युरो, धाराशिव