धाराशिव : राज्यभरातील 20 लाखाहून अधिक मुलींच्या मोफत उच्च शिक्षणाचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. मुलींप्रमाणेच आता गोरगरीब कुटुंबातील मुलांनाही उच्च शिक्षण मोफत मिळावे यासाठी आपण कटिबद्ध असून आपला पाठपुरावा सुरू आहे. अठराशे कोटी रूपयांचा भार उचलून मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण महायुती सरकारने सुरू केले अगदी त्याप्रमाणेच मुलांच्या मोफत उच्च शिक्षणासाठी आपण आग्रहाने प्रयत्न करीत असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
धाराशिव तालुक्यातील इर्ला, सारोळा, किणी आदी गावात दिवाळी फराळ भेटी दरम्यान आमदार पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. बारावीनंतर राज्यातील 20 लाखांपेक्षा अधिक मुलींना शासनाच्या माध्यमातून उच्च शिक्षण मोफत करण्यात आले आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, फार्मसी यासह तब्बल 642 वेगवेगळ्या कोर्सेसचा त्यात समावेश करण्यात आला आहे. उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे, केवळ आर्थिक अडचणीमुळे राज्यातील एकही मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, त्याकरिता अठराशे कोटी रूपयांचा भार राज्य सरकार स्वतः उचलणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. अगदी याप्रमाणेच मुलांच्या शिक्षणासाठीही आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील म्हणाले.
राज्यात अंदाजे पाच हजार तीनशेहून अधिक उच्च महाविद्यालये आहेत. ग्रामीण भागातील अनेक मुलांना केवळ आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे या महाविद्यालयांमधून शिक्षण घेता येत नाही. परिणामी अर्धवट शिक्षण सोडून रोजगारासाठी विस्थापित होण्याची वेळ अनेकांवर येते. शिक्षण पूर्ण नसल्यामुळे मिळणारा रोजगारही तुटपूंजा राहतो. हे दुष्टचक्र भेदण्यासाठी मुलींप्रमाणे मुलांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यायला हवी. परिणामी गावखेड्यातील वाड्यावस्ती तांड्यावरील होतकरू आणि हुशार मुलांचे शिक्षण अर्धवट सुटणार नाही. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उच्च शिक्षण मोफत उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण भागातील मुलांच्या उच्च शिक्षणाचे प्रमाणही नक्की वाढेल. त्यांच्या ठायी असलेल्या अंगभूत क्षमतांच्या जोरावर दर्जेदार उच्च शिक्षण मिळालेल्या या मुलांना रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. गोरगरीब कुटुंबातील मुलांनादेखील मोफत शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. ही बाब आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उच्च शिक्षणमंत्री यांच्या निदर्शनास यापूर्वीच आणून देत मुलांनादेखील शैक्षणिक शुल्कात शंभर टक्के सवलत देण्याची मागणीही आपण त्यांच्याकडे केली आहे. गरजवंत मराठा मुलांसह इतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मुलींप्रमाणेच मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय आवश्यक आहे. हा निर्णय आपण आपल्या हक्काच्या सरकारकडून नक्की करून घेवू. मात्र त्यासाठी आपल्या सर्वांची सोबत आणि सहकार्यही अत्यावश्यक असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.