Dharashiv : Tuljapur
धाराशिव, दि. 9 –
तुळजापूर येथील न्यायालयाच्या इमारतीचा दर्शनी भाग तुळजाभवानी मंदिराशी साधर्म्य असलेले राहणार आहे. इमारतीच्या दर्शनी भागात दगडी बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. तालुकस्तरीय न्यायालयाच्या सुधारित आराखड्याप्रमाणे राज्यात होणारी ही पहिलीच इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू देणार नाही, अशा शब्दांत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ग्वाही दिली. तुळजापूर येथील न्यायालयासंदर्भात विधीज्ञ मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी आज आ. राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेतली.
आमदार पाटील यांनी इमारत बांधकामाची पाहणी करून आढावा घेतला. न्यायालयाचे जवळपास काम पूर्ण होत आले आहे. अत्यंत आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या इमारतीचा दर्शनी भाग कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराशी साधर्म्य असलेला साकारण्यात येणार आहे. न्यायालयाच्या नवीन इमारतीचा आराखडा तयार करण्यात आल्यानंतर राज्यातील हे पहिले बांधकाम असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.
या इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून या ठिकाणी न्यायालयीन कामकाज सुरू करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. या बांधकामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असा शब्दही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर विधीज्ञ मंडळास दिला.
तुळजापूर येथील दिवाणी न्यायालयाची इमारत जुनी होती व कामकाजासाठी जागा अपुरी पडत होती. त्यामुळे हंगरगा (तुळ) येथे दोन हेक्टर जागेत न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या नवीन इमारतीमध्ये तळमजला व अधिक दोन मजले आहेत. सर्व सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या न्यायालयाच्या इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्पही असणार आहे. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून जमिनी खाली तयार करण्यात आलेल्या टाकीत साठवणूक केली जाणार आहे. या पाण्याचा वापर न्यायालय परिसरातील उद्यान आणि वृक्षसंगोपनासाठी केला जाणार आहे. इमारत बांधकामास सुरुवात करतेवेळीच परिसरात सर्व बाजूंनी वड, पिंपळ, करंज, कदंब, बकुळ, बहावा, रुद्राक्ष, कडुलिंब, नारळ यासारखी भारतीय प्रजातीची जवळपास 300 झाडे लावण्यात आली आहेत. विधिज्ञ मंडळाच्या सदस्यांनी देखील यामध्ये सातत्याने लक्ष दिले. पाठपुरावा केला आहे. इमारतीचे बांधकाम जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
यावेळी तुळजाभवानी मंदिर देवस्थानचे महंत श्री तुकोबा बुवा महाराज, नारायण नन्ननवरे, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.