धाराशिव येथे शबरी शहरी घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल लोकार्पण
धाराशिव-
आदिवासी पारधी समाजातील कुटुंबाना शबरी घरकुल योजनेतून घरकुल उभारण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी याकरिता मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी केले.
शबरी घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षात आदिवासी समाजाकरिता मंजूर झालेल्या हक्काच्या घरकुलांचे लोकार्पण सोमवार, दि.26 ऑगस्ट रोजी पापनास नगर धाराशिव येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूरचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कोंढारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ.ओंम्बासे म्हणाले की, बहुतांश पारधी समाज हा गायरान जमिनीवर वास्तव्य करत आहे. यापूर्वी या जमिनी नियमानुकूल करुन वैयक्तिक मालकी देण्यात येत होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोणतीही शासकीय जमिनी वैयक्तिक लाभार्थ्यास देणे बंद झाले. तरीही शासनाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत गावालगत असलेली शेतकर्याची जमीन शासनाला विक्री करण्याची तयारी असल्यास ती जमीन खरेदी करुन त्यावर घरकुल बांधता येतील. जमीन उपलब्ध नसल्यास एकरी 30 लाखापर्यंत जमीन खरेदी करण्याची शासनाची तयारी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पारधी समाजापर्यंत देखील ही योजना पोहचवता येईल, असेही त्यांनी सांगितले. पारधी समाजाने आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे. उपजीविकेसाठी कोणतेही साधन नसल्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून नोकरीमध्ये जाऊन आर्थिक सक्षम होण्यासाठी चांगला पर्याय असल्याचेही ते म्हणाले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूरचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे म्हणाले, शबरी घरकुल योजनेच्या मंजुरी व शासन आदेश निघण्यासाठी आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे यांनी सतत पाठपुरावा केला. त्यात यश मिळून डॉ.विजयकुमार गावित यांनी शासन अध्यादेश काढला. सगळीकडे घरकुल योजनेचा लक्ष्यांक असताना धाराशिवला 389 पैकी 44 घरकुलांना मंजुरी मिळाली. त्याकरिता 36 लाख मिळाले आहेत. उर्वरित निधीसाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरु असून तो निधी लवकर मिळेल, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे हे या कामात लक्ष घालून कामाला गती देत असल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकार्यांचे कौतुक केले. सध्या मंजूर असलेल्या 44 पैकी पूर्ण झालेल्या एका घराचे आज प्रातिनिधीक स्वरुपात लोकार्पण झाले असून 20 घरकुलांचे काम प्रगतिपथावर आहे. उर्वरित घरकुलांसाठी देखील दिवाळीपूर्वी निधी उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार डॉ.मैनाक घोष यांनी आदिवासी पारधी समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व विभागातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
प्रास्ताविकात आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे म्हणाले, धाराशिव येथील सर्वे क्र. 426 मधील गायरान जमिनीवर गेल्या दोन पिढ्यापासून पारधी समाज वास्तव्य करत आहे. परंतु त्यांना हक्काचे घरकुल अद्याप मिळालेले नव्हते. त्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करुन शबरी घरकुल योजनेअंतर्गत आदिवासी पारधी समाजाला घरकुलांचा लाभ मिळविण्यात यश आले. धाराशिव येथील लाभार्थ्यांसाठी 389 घरकुलांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला असून त्यापैकी 44 घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे. उर्वरित घरकुलांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना ते म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात कोणत्याही शासकीय कामासाठी 24 तासाच्या वर कधी वेळ लागला नाही. त्यामुळे आदिवासी पारधी समाजाच्या विकासासाठी असणार्या योजनांचा सुलभ पद्धतीने लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे गतवर्षी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीच्या आरतीसाठी जिल्हाधिकारी डॉ.ओंम्बासे यांनी स्वतःच्या माता-पित्यांना सोबत आणून आरतीपूजन केल्याच्या आठवणीला उजाळा देऊन अशा अधिकार्यांमुळे समाज प्रगतिपथावर जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रारंभी प्रातिनिधीक स्वरुपात सुरेश चंदू काळे या लाभार्थ्याच्या घरकुलाचे लोकार्पण करुन उर्वरित लाभार्थ्यांना जिल्हाधिकार्यांनी सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी केले. आभार सुनील काळे यांनी मानले. कार्यक्रमास पारधी वस्तीमधील घरकुल योजनेचे लाभार्थी, महिला, पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.