Dharashiv : तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे 367 एकर क्षेत्रावर एमआयडीसी मंजूर झाली असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन, त्यांना जमीनीचा योग्य मोबदला देऊन त्यांच्या सहमतीनेच भूसंपादन करण्यात येणार असल्याचा विश्वास आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला. काल दि.26/08/2024 रोजी तामलवाडी येथील शेतकऱ्यांनी आ.राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेऊन एमआयडीसी संदर्भातील त्यांच्या अडचणी व शंका मांडल्या होत्या. या सर्व बाबींचे निरसन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना आ.राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, आपण पूर्णत: शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जाणार आहेत, त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळवून देण्यात येईल. येथे एमआयडीसी झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसह स्थानिकांना मोठा फायदा होईल. या ठिकाणी औद्योगिक हब उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील असून येथे टेक्स्टाईल व गारमेंट उद्योग उभारण्यास अनेक उद्योजक इच्छुक आहेत.
प्रस्तावित जागेच्या शेजारी आणखी जमीन असून ती देखील संपादित करावी अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली. त्याअनुषंगाने आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी श्री.भांबरे यांच्याशी चर्चा केली असून ते उद्या दि.28/08/2024 रोजी जागेची पाहणी करण्यासाठी तामलवाडी येथे येणार आहेत.
महसुल विभागाने सदरील जमीनीचा दर रु.9 लक्ष निर्धारीत केला असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले. हा दर जरी गृहीत धरला तरी प्रचलित नियमाप्रमाणे चार पटीने एकरी रु.36 लक्ष मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यावेळी सचिन शिंदे, ज्ञानेश्वर जगताप, पोपट बेगड, बादशहा बेगडे, मारुती घोटकर ,दत्तात्रय घोटकर, महादेव घोटकर, नागनाथ भाकरे, बादशहा बेगडे, इस्माईल बेगडे, सचिन भोसले, निखिल सावंत, जोशी, चंद्रकांत सगर या शेतकऱ्यांसह माजी पंचायत समिती उपसभापती श्री.दत्ता शिंदे उपस्थित होते.