भेळ सेंटरवर कारवाई , एका बालकामगाराची मुक्तता , बालकामगारास बालगृहात पाठविले
धाराशिव दि.27 ( प्रतिनिधी ) कळंब शहरात एका भेळ सेंटरवर बाल कामगार काम करत असल्याची तक्रार ऑनलाईनव्दारे बाल कामगार समिती यांच्याकडे करण्यात आली होती.या तक्रारीची दखल घेऊन या भेळ सेंटरवर धाड टाकण्यात आली.भेळ सेंटरवर 13 वर्षाचा बाल कामगार काम करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी प्रथम खबर अहवाल (एफआयआर) नोंदविण्यात आला. पीडित बालकामगारास धाराशिव शहरातील बालगृहात दाखल करण्यात आले आहे.
ऑनलाईन प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा कृतीदल बालकामगार समितीमधील सरकारी कामगार अधिकारी,पोलीस ठाणे कार्यालयाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी /कर्मचारी चाईन्ड लाईन,जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अधिकारी,प्रकल्प संचालक युवा ग्राम विकास मंडळचे प्रतिनिधी यांनी 21 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास कळंब शहरातील येरमाळा रोडवरील माऊली भेळ सेंटर या ठिकाणी धाडसत्र राबवून बाल कामगाराची मुक्तता केली.
धाडसत्राच्यावेळी आस्थापनेत 1 बाल कामगार काम करत असल्याचे आढळून आले.चौकशी जबाबामध्ये हा बालकामागार 13 वर्षे वयोगटातील असल्याचे आढळून आले.कळंब पोलीस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (FIR) दाखल करण्यात आला. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी धाराशिव यांचेमार्फत या बालकामगारास जिल्हा बाल कल्याण समिती समोर उपस्थित करण्यात आले.बाल कल्याण समितीने अधिक्षक बालगृह / निरीक्षणगृह सांजा चौक धाराशिव यांना 1 महिना करिता बालगृहामध्ये दाखल करण्याचे आदेश दिले.याप्रकरणी पुढील कार्यवाही चालू आहे.
तसेच बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय / प्रकियेत कामावर ठेवणे तसेच 14 वर्षे पूर्ण न झालेले किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे.जर मालकाने/नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर, ठेवल्यास,त्यास 6 महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास किंवा रु. 20,000/- (रुपये वीस हजार) ते रु 50,000/- (रुपये पन्नास हजार) पर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.त्यामुळे बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवु नये,असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.