धाराशिव दि.31 ) महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे.
जिल्ह्यात लाभास पात्र असलेल्या जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेवून यंत्रणा काम करीत आहे.जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थ्यांकडून या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरु आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा जे लाभार्थी लाभ घेवू इच्छितात परंतू अशा लाभार्थ्यांकडे पिवळे/केशरी शिधापत्रिका (रेशनकार्ड) नाही,अशा लाभार्थ्यांनी त्यांना 2 लक्ष 50 हजार रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असेल परंतू ते उत्पन्नाचे प्रमाणपत्र ऑनलाईन मिळविण्यासाठी सर्व्हरची अडचण येत असेल. त्यामुळे त्या लाभार्थ्यांला उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्यास लागणारा विलंब लक्षात घेता अशा अर्जदारांकडून त्यांचे कुटूंबातील एकूण उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपये असल्याचे संबंधित अर्जदाराकडून स्वघोषणापत्र भरुन घ्यावे.
संबंधित अर्जदार यांचेकडून स्वघोषणापत्र भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित गावाच्या तलाठ्याची राहील.हे स्वघोषणापत्र फक्त मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेसाठी 15 ऑगस्ट 2024 पर्यंतच ग्राह्य धरण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील या योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या महिलांनी योजनेसाठी अर्ज करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.