भारतीय संविधान ग्रंथाचे अवलोकन करून न्याय व्यवस्थेला गती द्यावी : न्यायमूर्ती प्रसन्न वराळे
भारतीय संविधान पालखी ठरली सोहळ्याचे विशेष आकर्षण
धाराशिव,दि.27(जिमाका) भारतीय संस्कृतीत विविध जाती,धर्माचे पवित्र ग्रंथ आहे,त्याचा स्वाभिमान जपला पाहिजे.परंतु न्याय मंदिरात पवित्र अशा भारतीय संविधान ग्रंथाचे अवलोकन करुन त्या पद्धतीने काम केल्यास मिळणारे आत्मिक समाधान विशेष असे असते.तरुण वकिल मंडळींनी इतिहासाविषयी सजग असले पाहिजे.कायद्याच्या पुस्तकाबरोबरच विविध पुस्तकांचे मित्र होऊन सामाजिक दृष्टिकोन जागृत ठेवावा.असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती प्रसन्न वराळे यांनी केले.
उमरगा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन आज शनिवारी 27 एप्रिल रोजी न्यायमुर्ती श्री.वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या.अरूण पेडणेकर होते.प्रमुख पाहुणे म्हणुन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती रविंद्र घुगे,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजु शेंडे,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. के.अनभुले,महाराष्ट्र व गोवा बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष अँड. मिलींद पाटील,उमरगा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड. जी.के. गायकवाड यांची उपस्थिती होती.
न्यायमुर्ती वराळे बोलताना म्हणाले की,व्हॉटसॉपच्या माध्यमातून मिळणारे ज्ञान समजण्याचा भ्रम झाला आहे.पण माहिती आणि ज्ञान यात फरक आहे.ज्ञान संपादन करावे लागते.न्यायालयाची वास्तु सुंदर झाली आहे.परंतु वास्तुतील जडत्व जाऊन चैतन्याचा प्रवेश झाला पाहिजे.न्याय मंदिरात पक्षकार मोठ्या अपेक्षेने येतात.त्यांच्यासाठी न्याय दानाची प्रक्रिया व्हावी.प्रत्येक व्यक्ति पर्यावरण स्नेही असले पाहिजे,असे संदेश या कार्यक्रमात वृक्ष भेट देऊन करण्यात आला.
महान महापुरुष,जेष्ठ विधीज्ञ यांच्या पुस्तकाचे वाचन आणि आदर्श घेऊन विधीज्ञ मंडळींनी काम करावे असे सांगून या इमारतीच्या उभारणीसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या विविध यंत्रणेचे व व्यक्तीचे न्या.वराळे यांनी कौतुक केले. यावेळी न्या.पेडणेकर, न्या.घुगे,अँड.मिलींद पाटील यांची भाषणे झाली.कार्यक्रमाला माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले,प्रा.सुरेश बिराजदार,डॉ.चंद्रकांत महाजन, जितेंद्र शिंदे,कंत्राटदार विक्रम गायकवाड,सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार,सिद्रामप्पा चिंचोळे,किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी गणेश पवार, तहसीलदार गोविंद येरमे,गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड,विधीज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड.अक्षय तोतला,सचिव ॲड.प्रवीण पाटील, सहसचिव ॲड.वर्षा जाधव,कोषाध्यक्ष
ॲड.दादाराव कातपुरे,अँड.एम.डी. गायकवाड,अँड.व्ही.एस.आळंगे,अँड. संदिप देशपांडे, अँड. प्रविण तोतला, अँड.एस.पी.इनामदार,अँड. अमित सांगवे,अँड.शिल्पा सुरवसे यांची उपस्थिती होती.
उमरगा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड.जी.के.गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शेंडे यांनी स्वागतपर भाषण केले.संजय मैंदर्गी यांनी सूत्रसंचालन केले.उपस्थितांचे आभार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या.डी.के.अनभुले यांनी आभार मानले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वोच्च पदापर्यंत पोहचलो ! विषमतेचे साखळदंड तोडून समानतेचा मंत्र देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्वोच्च पदापर्यंत पोहचलो अशी भावना न्यायमुर्ती श्री.वराळे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी श्री.छत्रपती शिवराय, संत तुकाराम,संत नामदेव,संत रामदास यांच्या सामाजिक कर्तृत्वाची महती सांगितली.त्यांचा आदर्श सामाजिक परिवर्तनासाठी महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.
भारतीय संविधानाचा दिमाखदार पालखी सोहळा
जिल्हा न्यायालयाची देखणी इमारत उमरगा शहराच्या वैभवात भर टाकणारी आहे.यावेळी येथील विधीज्ञ मंडळाच्या सदस्यांनी नुतन इमारतीतून व्यासपीठापर्यंत टाळ मृदंगाच्या निनादात,वारकऱ्यांच्या वेशभुषेत भारतीय संविधानाचा लक्षवेधक पालखी सोहळा काढण्यात आला.हे दृश्य पाहून व्यासपीठावरून न्यायमुर्ती श्री.वराळे यांनी सोहळ्यात सहभागी होऊन पालखीला खांदा दिला.
—-