धाराशिव ता. 26- तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. अच्छे दिन येण्याचं तर सोडा पण आता ‘होते ते दिवस बरे होते’ असं म्हणायची वेळ आपल्यावर आल्याचे मत संयोजिनी राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुंगशी ता.बार्शी येथील सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी संयोजिनीराजे म्हणाल्या की,गेल्या निवडणुकीत आपण ओम दादांना आपले आशीर्वाद देऊन दिल्लीत पाठवलं, त्यांना खासदार केलं. तेव्हा आपली निशाणी धनुष्य बाण होता. पण आता आपलं चिन्ह मशाल आहे, ही मशाल तुम्ही घरोघरी पोहचविण्याचे अवाहन त्यानी यावेळी केले. ही निवडणूक आता फक्त धाराशिवसाठी महत्त्वाचे नाहीये. तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाची आहे. कारण देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि तिची झळ तुमच्या माझ्यासारख्या घर चालवणाऱ्या महिलांना सगळ्यात जास्त बसलेली आहे. म्हणजे 2014 ला जो सिलेंडर आपण चारशे ते साडेचारशे रुपयाला घेत होतो. तो सिलेंडर आता हजार रुपयापर्यंत गेला. जे गोडे तेल आपल्याला आधी साठ-सत्तर रुपये किलोने मिळत होतं त्या तेलाचा भाव आता 140-150 रुपये किलोच्या घरात गेलेला आहे. ज्या डाळी-साळी आपण 60-70 रुपये किलोने विकत घेत होतो त्या आता 120 ते 200 रुपये किलोने मिळतात. मग तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. अच्छे दिन येण्याचं तर सोडा पण आता ‘होते ते दिवस बरे होते’ असं म्हणायची वेळ आपल्यावर आलेली आहे