Dharashiv : ( osmanabad 40 loksabha election )
लोकसभा उमेदवार संदर्भात सकल मराठा समाज धाराशिव यांची बैठक शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
याविषयी सविस्तर वृत्त असे की अंतरवाली सराटी येथे रविवार दिनांक 24 मार्च रोजी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत मराठा समाजाची महाबैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत एक उमेदवार देण्याचा मराठा समाजाचा एकमुखी निर्णय झाला त्यानुसार धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांची व समाजाची बैठक स्वयंवर मंगल कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत औसा, उमरगा, लोहारा, तुळजापूर, धाराशिव, कळंब,वाशी, भूम, परंडा, बार्शी या तालुक्यातून इच्छुक उमेदवार व समाज बांधव तसेच महिला भगिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बैठकीची सुरुवात उमरगा तालुक्यातील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकास श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर सर्व उपस्थित समाजबांधवांनी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील देतील तो उमेदवार सर्वमान्य असणार असून सर्व समाज बांधव एकमुखाने पाठीशी राहण्याची शपथ घेतली.
यावेळी प्रत्येक तालुक्यातून एक उमेदवार निश्चित करून त्यातील एक उमेदवार एक मुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मराठा समाज बांधव भगिनी यांनी मोठी गर्दी केली होती.