टेक्निकल टेक्स्टाईल पार्क साठी महत्वपूर्ण टप्पा पूर्ण -Technical Textile Park

Spread the love

धाराशिव,दि.16 (प्रतिनिधी ) कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याच्या प्रक्रियेला गती येत असून आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोलमेज बैठकीमध्ये अनेक उद्योजकांनी गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली आहे. या बैठकीमध्ये बॉम्बे टेक्स्टाईल रिसर्च, सुदर्शन फॅब्रिक्स, रेल्वे, मे. अडवांटेज स्पोर्ट्स, मे. श्रेयस एंटरप्राइजेस अँड स्टार कॉटन, बिर्ला सेल्युलेस इंडस्ट्रीज, जेआयएसएल यासारख्या नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधीसह वस्त्रोद्योग व उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.

मराठवाड्याचा समावेश उद्योग विभागाच्या झोन 2 मध्ये असल्याने तसेच धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा असल्याने उद्योजकांना येथे आकर्षित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध सवलती व विशेष सूट दिली जात आहे. या ठिकाणी जमीन, पाणी, वीज व दळणवळणाच्या पर्याप्त साधनांसह कमी खर्चात मनुष्यबळाची देखील उपलब्धता असल्याने येथे नवीन उद्योग सुरू करण्यास पूरक वातावरण आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्रीज मध्ये रोजगार निर्मितीला मोठा वाव असल्याने शासनाकडून विशेष सवलती दिल्या जात असून ३० ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देखील दिले जाते. कुशल मनुष्यबळ निर्मितीच्या अनुषंगाने इचलकरंजी येथे ५० युवकांना प्रशिक्षण देण्याबाबत देखील चर्चा झाली, तसेच पुढील काळात आवश्यक प्रशिक्षणाची सुविधा येथेच निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

विविध कंपन्यांच्या आलेल्या प्रतिनिधींनी एमआयडीसी व वस्त्रोद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कौडगाव औद्योगिक क्षेत्राची पाहणी केली, व तद्नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गोलमेज बैठक (राऊंड टेबल डिस्कशन) घेण्यात आली. एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राठोड यांनी सरकार कडून देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधा व अनुदानाबाबत सविस्तर माहिती दिली. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह श्री प्रवीण परदेशी, रुपराशी मॅडम, उद्योजक महेश कावरी यांनी मार्गदर्शन केले व उद्योजकांशी संवाद साधला.

कौडगाव औद्योगिक क्षेत्र आराखड्यात टेक्निकल टेक्स्टाईल पार्क साठी ९०.२० हेक्टर क्षेत्रामध्ये लहान मोठ्या आकाराचे ७२ भूखंड व सीईटीपी, सीएफसी, पोलीस स्टेशन व फायर स्टेशन साठी चार भूखंड राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

सुदरील बैठकीस आ. राणाजगजीतसिंह पाटील, केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी, मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रवीण परदेशी, एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, सह आयुक्त एस. पी. वर्मा, संचालक एस. के सिंग, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी अमित भांमरे, यांच्यासह उद्योजक महेश कावरी, उदय खाडीलकर, रितेश भारंबे, तानाजी कदम, धीरज कोंदरे, ऋषिकेश कोंदरे, अंकित राठोड, जय राणे, किशोर हिंदोचा, यांच्यासह स्थानिक उद्योजक , औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!