धाराशिव दि.१० ( प्रतिनिधी ) जिल्हयातील १ ते १९ वर्षापर्यंतची सर्व बालके तसेच किशोवयीन मुलामुलींच्या सर्वागीण आरोग्य विकासासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनात सार्वजनिक आरोग्य विभाग,वैद्यकिय शिक्षण विभाग,एकात्मिक बाल विकास विभाग,शिक्षण विभाग आणि अदिवासी विकास विभाग यांच्या समन्वयाने “राष्ट्रीय जंतनाशक मोहिम ” १३ फेब्रुवारी २०२४ व मॉपअप दिन २० फेब्रुवारी २०२४ यादिवशी राबविली जाणार आहे.या दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांमुलींना अल्बेन्डॅझॉलची गोळी खाऊ घातली जाणार आहे.
वर्षातून फेब्रुवारी व ऑगस्ट या महिन्यात दोन वेळा जंतनाशक मोहिम राबविली जाते.जंतामुळे रक्तक्षय,भूक मंदावणे,अशक्तपणा व चिडचिड, पोटदुखी,मळमळ,जुलाब,वजन घटने अशा विविध समस्या उदभवून गुंतागुंता निर्माण होऊ शकते.यावर मात करण्यासाठी राज्यात १३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविण्यात येणार आहे.जर जंतनाशक गोळी खाल्ली नाही त्यांना २० फेब्रुवारी रोजी गोळी खायला देण्यात येणार आहे.
१ ते ५ वर्षवयोगटातील मुला-मुलींना ही गोळी शाळेतून दिली जाणार आहे.६ -१९ वर्षाच्या मुला – मुलींना ही गोळी अंगणवाडीतून दिली जाणार आहे.नोंदणी न झालेल्या व शाळाबाहय १ ते १० वर्षातील मुला मुलींना अंगणवाडीत जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.अल्बेन्डॅझॉलची गोळी ही मुला-मुलींसाठी सुरक्षित आहे.ही गोळी अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका/आशा व शाळांमध्ये शिक्षक/आरोग्य सेवक / सेविकांसमोरच खावू घालायची असून,पालकांसोबत अथवा मुला-मुलींसोबत घरी देण्यात येणार नाही.
या अल्बेंडॅझॉलच्या गोळीमुळे रक्तक्षय रोखण्यास मदत होते.अन्न पचनास व शोषून घेण्यास सुधारणा होते.तसेच या जंतनाशक गोळीमुळे शाळा /अंगणवाडीमधील मुला – मुलींची हजेरी,शिकण्याची क्षमता व एकाग्रता वाढते.मुला-मुलींची कार्यक्षमता वाढवविण्यासाठी व उपजिविकेसाठी मदत होते. जंतनाशक गोळीमुळे मुला-मुलींच्या शारीरीक व मानसिक वाढीस मदत होते.असे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगितले.
जंत कमी करण्याकरीता अधिकचे उपाय म्हणजे नखे स्वच्छ ठेवावी व वेळेवर कापावीत.पायात नेहमी बुट घालावे.उघडयावर शौचास बसू नये.नेहमी शौचालयाचा वापर करावा.आपले हात साबणाने धुवावे. विशेषतः जेवणाआधी आणि शौचाहून आल्यानंतर.
तसेच जंतनाशक मोहिम दिनी निर्जंतुक पाणी,जलसंजीवनीची तात्काळ उपलब्धता आपत्कालीन मदत सेवेच्या क्रमांकाची यादी प्रवेशद्वारावर वा भिंतीवर चिकटवावी व जंतनाशक गोळी घशात अडकू नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यासमोर शाळेत,अंगणवाडीमध्ये ही गोळी बालकाला चावून खाण्यास तसेच १ ते २ वर्षमधील बालकांना गोळीची पावडर करून देण्यात यावी.असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास यांनी कळविले आहे.