धाराशिव दि.०३ (जिमाका) जिल्हयाच्या ग्रामीण भागात वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना देखील बोगस डॉक्टर रुग्णालय थाटुन व गावात जावुन डॉक्टर आहे असे सांगुन सामान्य नागरिकांवर उपचार करत आहेत.त्यामुळे बोगस डॉक्टराकडुन नागरीकाच्या जिवाशी खेळ करण्यात येत आहे.बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट अशा बातम्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित होत आहे.
आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेऊन त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य प्रशासनाने वेळीच खबरदारी घेवुन जिल्हयातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा शोध घेवुन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी जिल्हा,तालुका व नगरपालीका/नगर परिषद स्तरावर शासन नियमानुसार समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.तालुकास्तरावर अध्यक्ष म्हणुन गटविकास अधिकारी,सदस्य सचिव म्हणुन तालुका आरोग्य अधिकारी व सदस्य म्हणुन आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून शासन निर्णयानुसार बोगस डॉक्टरावर कारवाई करण्याचे आदेश २ डिसेंबर रोजी २०२४ देण्यात आले आहेत.
संबंधित समितीच्या कार्याक्षेत्रातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा शोध घेवुन तात्काळ शासन प्रचलीत नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच जिल्हयातील सर्व जनतेने बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळुन आल्यास प्रशासनास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागामध्ये आरोग्य कर्मचारी यांच्या गृहभेटी दरम्यान गावामध्ये बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळून आल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकारी यांना कळविण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहे.तसेच आरोग्य विभागास याबाबत सतर्क राहण्याचे कळविले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांनी दिली.