धाराशिव,दि.9(प्रतिनिधी ): जिल्हा आकांक्षित असून जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी तसेच दुष्काळग्रस्त असल्याने पाणीटंचाई आहे. 10 ते 12 टक्केच पाणीसाठा आहे. जनावरांना चारा टंचाई जाणवत असल्याने चारा छावण्या तात्काळ सुरू करण्यासाठी सन 2024-25 यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेत 350 ते 400 कोटींची आवश्यकता असल्याची विनंती पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी मागील महिन्यात राज्यस्तरीय बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वित्त नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. पालकमंत्र्यांच्या या प्रयत्नामुळे जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 च्या प्रारूप आराखड्यासाठी शासनाने 408 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे.
जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी 10 जानेवारी 2024 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी जिल्ह्याचे प्रभावीपणे सादरीकरण करून वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना सांगितले की,जिल्हा आकांक्षित आहे.जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे.जिल्हा देशात तिसऱ्या क्रमांकाचा मागासलेला व दुष्काळग्रस्त आहे.जिल्ह्यात प्रामुख्याने पाणीटंचाई असून यंदा एकूण 10 ते 12 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे.जनावरांना देखील चारा टंचाई जाणवत आहे. जनावरांसाठी चारा छावण्यास सुरू करण्याची तात्काळ आवश्यकता आहे. तसेच जिल्ह्याकरीता सन 2024-25 या वर्षाकरिता अतिरिक्त 350 ते 400 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.याशिवाय जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी जिल्ह्याला भरीव वाढीव तरतूद करून द्यावी,अशी विनंती पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी राज्यस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना केली.तसेच जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 यावर्षीच्या जिल्ह्याच्या प्रारूप आराखड्यासाठी एकूण ४०८ कोटी रुपयांची तरतूद मंजूर केल्याचे उपसचिव, वित्त व नियोजन यांनी कळविले आहे.