धाराशिव : तालुक्यातील तेरणा मध्यम प्रकल्पावरील उजवा व डावा कालवा विशेष दुरुस्ती कामाचे तेर येथे तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. १६५२ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असुन ९ गावांच्या शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. आगामी काळात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत पाणी मिळण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. १९६४ मध्ये तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याचे बांधकाम केले गेले. परंतु नादुरुस्त असल्याने २०११ पासून या कॅनलचा वापर झाला नाही. आपल्या पाठपुराव्याने कालव्याच्या दुरुस्ती साठी विशेष निधी मंजूर झाल्यावर या कामाचा शुभारंभ करण्यात आला. पावसाळा सुरू होण्याच्या आगोदर ३ महिन्यात प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा शेतीला फायदा होऊन थेट आर्थिक लाभ मिळण्यास सहकार्य होणार आहे. यासोबतच बंद पाईप लाईनची योजना देखील आपल्याला लवकरच कार्यान्वित करायची आहे. तेरणा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याची दुरूस्तीसाठी ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर झाला असून येणाऱ्या काळात कृष्णेचे पाणी मराठवाड्याकडे आणण्यासाठी काम चालू आहे. डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यामुळे सिंचन क्षेत्र वाढले आहे. त्यांचे प्रयत्न व शेतकऱ्यांचे कष्ट यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलले आहे. अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यांनतर कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी हजारो कोटींची तरतूद केली आहे. कौडगाव येथील टेक्सटाईल्स पार्क मध्ये १०,००० रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून पीकविमा, विश्वकर्मा योजनेविषयी यावेळी आ. पाटील यांनी माहिती दिली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, सुरेश देशमुख, शिवाजी नाईकवाडी, सरपंच सौ.दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड, नवनाथ नाईकवाडी, निहाल काझी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अ.ना.मदने, उपअभियंता बी.एम नाईकवाडी, दिपक नाईकनवरे, शाखेच्या अभियंता एस.एम.वाघमारे, बबलू मोमीन, भास्कर माळी, बालाजी पांढरे, मंगेश फंड, नवनाथ इंगळे, शभारत नाईकवाडी, विलास रसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.