धाराशिव दि.३१) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाकडे जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ या दोन महामंडळाचे कामकाज सोपविण्यात आले आहे.तसेच या दोन्ही महामंडळाचे कामकाज सुरु झाले आहे.
राज्यातील गुरव समाज व लिंगायत समाजातील घटकांसाठी व्यापार,उद्योग,शेतीपुरक व्यवसाय तसेच व्यावसायिक व उच्च शिक्षणासाठी विविध कर्ज योजना उपलब्ध आहेत.या कर्ज योजनांची माहिती व वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे.
अ.ऑनलाईन कर्ज योजना :
राष्ट्रीयकृत,नागरी,सहकारी, शेड्युल्ड/मल्टीशेड्युल्ड बँकाकडून घेतलेल्या केलेल्या कर्जाच्या दरमहा नियमीत परतफेड केलेल्या हप्त्यावरील 12 टक्केपर्यंत व्याजाच्या व 5 वर्ष मुदती कर्जावरील व्याज रक्कमेचा परतावा लाभार्थीस ऑनलाईन पध्दतीने बचत खात्यात महामंडळातर्फे जमा करण्यात येतो. तथापि,लाभार्थींनी बँकाकडे कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी महामंडळाचे L.O.I. (पात्रता प्रमाणपत्र) प्रथम घेणे अनिवार्य आहे. ऑनलाईन कर्ज योजनांसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईटवर अर्ज करावा.
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना :
व्यापार,उद्योग,सेवा व शेतीपुरक व्यवसायासाठी लागणाऱ्या कर्जासाठी कर्ज मर्यादा ही 10 लाख रुपयापर्यंत आहे.अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपये असणे आवश्यक आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजना : बचत गट,भागीदारी संस्था (निबंधक मुंबई प्राधिकृत), सहकारी संस्था (जिल्हा उपनिबंधक प्राधिकृत) आदी यासाठी पात्र आहेत.तसेच या योजनेंतर्गत कर्ज मर्यादा 10 ते 50 लाख रुपयापर्यंत आहे.गटातील सभासदांची वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 8 लक्ष रुपयापर्यंत आहे.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना :
ही योजना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी आहे. या योजनेंतर्गत देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लक्ष रुपये तसेच परदेशी शिक्षणासाठी 20 लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्ज मिळते.आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी,व्यावसायिक व व्यवस्थापन,कृषी,अन्नप्रक्रीया व पशु विज्ञान या अभ्यासक्रमाकरीता ही योजना लागू आहे.अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 8 लाख रुपयांची आहे.
महिला स्वयंसिध्दी कर्ज व्याज परतावा योजना :
महिला बचत गटांसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या लोकसंचालीत साधनकेंद्राच्या सहाय्याने राबविण्यात येते. प्रथम टप्प्यात 5 लक्ष कर्ज घेण्यास मान्यता व सदर कर्ज परतफेडीनंतर द्वितीय टप्प्यात 10 लक्ष रुपये कर्ज घेण्यास पात्रता होते.
ऑफलाईन कर्ज योजना :
1) थेट कर्ज योजना : या योजनेंतर्गत महामंडळामार्फत 1 लक्ष रुपये कर्ज देण्यात येते. नियमित कर्ज परतफेडीवर व्याज आकारले जाणार नाही. तथापि, थकीत कर्ज रक्कमेवर 4 टक्के व्याज आकारले जाते. कर्ज परतफेड कालावधी हा 4 वर्षाचा आहे. ज्याचा मासिक हप्ता 2 हजार 85 रुपये असतो. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा 1 लक्ष रुपयांपर्यंत आहे.
2) बीजभांडवल कर्ज योजना : राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत राबविण्यात येते. या योजनेंतर्गत कर्ज मर्यादा 5 लक्ष रुपयांपर्यंत आहे. बँक मंजूर कर्ज रक्कमेत महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के, लाभार्थी सहभाग 5 टक्के असतो. व्याज दर महामंडळ सहभागावर 6 टक्के, बँकेच्या सहभागावर प्रचलीत बँक व्याज दरानुसार आकारण्यात येते. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ही 1 लक्ष रुपयांपर्यंत असावयास हवी.
पात्रतेचे निकष :
लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा इतर मागासवर्गीय रहिवासी असावा. तो महामंडळाचा, बँकेचा अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी वयोमर्यादा 18 ते 50 वर्षाची आहे. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्याचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा. कर्जाच्या अटी व शर्ती महामंडळ ठरवेल त्याप्रमाणे राहतील. सर्व व्याज परतावा योजनांसाठी लाभार्थींने कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे जाण्यापूर्वी महामंडळाचे L.O.I. (पात्रता प्रमाणपत्र) घेणे अनिवार्य आहे.
गुरव व लिंगायत समाजातील बांधवांनी योजनांच्या अधिक माहितीसाठी व ऑफलाईन कर्ज योजनांच्या अर्जासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, पहिला मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ, धाराशिव. दुरध्वनी क्रमांक (02472) 223863 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.