धाराशिव-
दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्यांसाठी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी रोजी श्रद्धांजली सभा घेण्यात येणार असल्याची माहिती धार्मिक एकता ट्रस्टचे नवनाथ दुधाळ यांनी दिली. या श्रद्धांजली सभेत शेतकरी, शेतमजूर व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील श्री.दुधाळ यांनी केले आहे.
याबाबत धाराशिवच्या जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण देशात धार्मिक एकता ट्रस्ट कडून निःशुल्क कर्जमुक्त भारत अभियान सुरू आहे. त्यामध्ये कर्जामुळे कुणीही आत्महत्येला बळी पडू नये. त्यासाठी आणि कर्जदार लोकांना होणार्या त्रासाची आम्ही दखल घेत आहोत. अभियानामध्ये जमा झालेल्या कर्जदारची माहिती आम्ही वित्तमंत्री कार्यालय, प्रधानमंत्री कार्यालय तसेच आरबीआय यांना पाठविण्यात येत आहे. कर्ज वसुली करणारे रिकव्हरी एजंट कर्जदारांवर चुकीच्या पद्धतीने दबाव टाकतात, धमकवतात. आरबीआयच्या गाईडलाईनचे ते पालन करत नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. नागरिक हे कर्जबुडवे नाहीत. प्रामाणिकपणे आपल्या कर्जाची परतफेड करायला ते तयार असतात. कधी कधी त्यांना फक्त वेळ हवा असतो. कर्जामुळे प्रताडीत अनेक बांधवानी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी याकरिता सर्व अभियानातील सहकार्यांच्या वतीने 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांनी निवेदनात नमूद केले आहे.