संत बाळू मामाच्या मेंढ्यांना वाजतगाजत घाटंग्री गावकऱ्यांचा निरोप
धाराशिव (प्रतिनिधी) – बाळुमामाची मेंढरं गेल्या अनेक वर्षापासून भक्तांना भुरळ घालत आहेत. या मेंढराच्या माध्यमातून एक प्रकारे बाळूमामांची सेवा होत असल्याची भावना भोळ्या भाबड्या भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात रुढ होत आहे. हीच मेंढरे धाराशिव तालुक्यातील घाटंग्री गावामध्ये १३ दिवस मुक्काम होती. दि.२३ जानेवारी रोजी बार्शी तालुक्यातील भातंबऱ्याकडे मार्गस्थ झाली यावेळी गावकऱ्यांनी ढोल ताशा व बँजोच्या दणदणाटात वाजत गाजत व भंडाऱ्याची उधळण करीत निरोप दिला. तसेच महिलांनी या मिरवणुकीत डोक्यावर पाण्याने भरलेले कलश घेऊन या मिरवणुकीची शोभा वाढविली.
कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा यांच्या मेंढी माऊली बगा नं. ८ चे धाराशिव तालुक्यातील घाटंग्री या ठिकाणी ११ ते २३ जानेवारी रोजी मुक्काम होता. गेल्या १७ वर्षाखाली बाळू मामाच्या मेंढ्या गावात आल्या होत्या. त्यावेळी श्री बाळू मामांच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली. तर यावेळी संत बाळू मामांच्या दर्शनाला पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली. दररोज धनगरी ओव्या, किर्तन भजन व दररोज देवाची आरती करण्यात आली आहे. या काळात पंचक्रोशीतील नागरिकांनी देणगी स्वरूपात महाप्रसाद दिला आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी मेंढरांना चरता यावे यासाठी पिके असलेल्या जमिनी उपलब्ध करून दिल्या. तर दिवसभर पिकांमध्ये चरल्यानंतर देखील ती पिके आज टवटवीत आहेत. तसेच याठिकाणी ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. विशेष म्हणजे १३ दिवसांच्या मुक्कामामध्ये मेंढरा सोबत असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.