बार्शी (प्रतिनिधी) व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन बार्शी येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. व्हॉईस ऑफ मीडियाच्या बार्शी येथील मुख्य कार्यालय आता ग्रामीण भागाचा कनेक्ट वाढवणार आहे. ग्रामीण भागातील संघटना वाढीसाठी आणि ग्रामीण भागातल्या पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण असल्याची माहिती ही या निमित्ताने देण्यात आली.
यावेळी ह.भ.प.ॲड.जयवंत बाेधले महाराज, आमदार राजेंद्र राउत, माजी मंत्री ॲड.दिलीप सोपल, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, वृक्ष वितरण संस्थेचे बाळासाहेब पानसरे, आरोग्य विभागाचे प्रमुख भिमेश मुतुला, सरचिटणीस चेतन कात्रे, विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, अरुण ठोंबरे, अमर चोंदे उपस्थित होते.
बाेधले म्हणाले, पत्रकारांच्या कल्याणासाठी पंचसुत्रीच्या माध्यमातून व्हाॅईस ऑफ मीडिया संस्थेचे कार्य सध्या सुरु आहे. पत्रकार बऱ्याचदा अपूर्व काय आहे हे शोधत असतात. कोणत्याही कार्यक्रमातील अचूक शोधण्याची बुध्दी भगवंताने पत्रकारांना दिली आहे. एखाद्याच्या भाषणातील नेमका मुद्दा काय, हे त्यांना राजहंसाप्रमाणे कळतो, तो सारासार विचार करणारा, स्थिर बुध्दीचा व स्थितप्रज्ञ असतो. कारण तो समस्त परिस्थितीकडे साक्षीभावाने पाहत असतो, तो कोणाही एका विशिष्ट पक्षाचा नसतो, त्याच्यातून बाहेर राहून एका तटस्थ व्रत्तीने बघत असतो की नेमके हे काय आहे. तशा व्रत्तीने काम करणारा समाजातील एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे पत्रकार होय. समाजातील अनेक गोष्टी समाजासमोर आणि शासनदरबारी सतत मांडण्याचे कार्य तो करत असतो. बातमी कळणं आणि अनुभवनं वेगळं, लेखन वाचनाने त्याचा अनुभव होतो, त्यातील शब्द पाहतांना वाचतांना आपले मनही वाचत असतो. पत्रकारांच्या समस्येप्रमाणे महाराज लोकांचीही आहे. मधल्या कोरोनासारख्या काळात त्याचा प्रत्यय अनेकांना आला. पत्रकार आणि महाराजांच्या कार्याला खूप छान अशा नुसत्या शाबासकीने त्यांच्या कुटुंबाची व प्रपंचाची समस्या संपत नाही. बऱ्याचदा हतबल होवून बुध्दी अन्य मार्गाकडे जाण्याची शक्यता असते, त्यामुळे सामाजिक परिस्थितीच माणसाच्या मनाला बिघडविण्याचे कारण ठरते. समाजातील स हे अक्षर संस्कार, सात्विकता, संस्कृती समन्वयाचे असल्याने ही पत्रकारिता टिकणे अत्यंत गरजेचे आहे. ती गरज व आवश्यकता ओळखून व्हाॅईस ऑफ मीडिया संघटनेने बार्शीसारख्या अत्यंत अध्यात्मिक आणि ऐतिहासिक द्रष्टीकोनातून महत्वपूर्ण स्थान असलेल्या नगरीमध्ये आज राज्याचं कार्यालय होतंय, खरंतर हा आम्हा सर्व बार्शीकरांच्या दृष्टीने अत्यंत मोठा अभिमान आहे. बार्शीला व्हाॅईस ऑफ मीडियाची राज्याची पत्रकारांची राजधानी म्हणायला आता हरकत नाही. पत्रकारांच्या हातातील लेखनी आणि साधुसंतांची वाणी एकत्र झाली तर समाजामध्ये नक्की बदल होईल.
सोपल म्हणाले, पत्रकारांच्या संघटनेचे व्हाईस ऑफ मीडिया हे नाव सर्वसामान्यांचा आवाज दर्शविणारे, सुरु असलेल्या कार्याला खूप साजेसे असून, यातील विश्वस्त हे लोकांना आश्वस्त करणारे आहेत. अनेक पत्रकार हे नुसत्या पत्रकारितेवर अवलंबून आहेत, अनेक पत्र ही त्याचा व्यवसाय म्हणून अवलंबून आहेत याचा मेळ घालायचे काम या संघटनेचे आहे. काही चॅनल्स पूर्वी कसे बोलत होते आता कसे बोलतात हे आपल्या लक्षात येते. पण सध्या जो सोशल मीडिया कार्यरत आहे त्याची समाजाला गरज आहे. मोठी माणसं आता आपल्या उपयोगाची नाहीत, छोटी माणसंच आपल्याला न्याय देतील अशी लोकभावना आता निर्माण झाली आहे. शेवटी पत्रकार-पत्रकार म्हणजे आहे तरी काय, शासन कोणाचेही असो, त्यावर अंकुश ठेवण्याचे काम म्हणजे पत्रकारिता. पूर्वीपासून चालत आलेल्या पत्रकारितेतील धुरिणांचे जे तत्व आहे त्याच तत्वाला धरुन कार्य चालू ठेवण्याचे काम व्हाॅईस ऑफ मीडिया निश्चित करते अशी खात्री असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे म्हणाले, बार्शीला संघटनेचे कार्यालय सुरु करण्यामागे अनेक वेगवेगळे विषय होते. बहुतांशी जिल्ह्यांना जोडणारा दुवा असलेले ठिकाण म्हणून त्याचा विचार केला. ग्रामीण महाराष्ट्राला जोडण्यासाठी, संपर्कासाठी याची गरज होती. मोठ्या शहरापेक्षा तालुक्याच्या ठिकाणी स्कोप असतो. न्यायाधिशाला देखिल कुठेतरी व्यक्त व्हावेसे वाटते तेव्हा त्याला पत्रकार दिसतो. परंतु पत्रकारिता करणारी संपूर्ण यंत्रणा आज हतबल होवून बसलेली आहे. उद्या माझी नोकरी राहिल का याची शाश्वती नसते, मग कोणासाठी ते काम करायचे हा प्रश्न निर्माण होतो. आम्ही पत्रकार संघटनेच्या माध्यमातून नेमके काम काय करायचे याचा अभ्यास करत असतांना संशोधनावर भर दिला. पत्रकारांचे घर, आरोग्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण, नवीन तंत्रज्ञान आणि निवृत्तीनंतरचे कार्य ही पंचसूत्री हाती घेतली व त्यानुसार आमचा प्रवास सुरु आहे. देशभरातील ८५ टक्के पत्रकारांची आजची अवस्था अशी आहे की त्यांच्यासमोर उद्या काय करायचे हा मोठा प्रश्न आहे.
उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी प्रास्ताविकात पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि भविष्यातील आराखडा मांडला. मुद्रण, इलेक्ट्रॉनिक्स, डिजीटल अशा वेगवेगळ्या विभागात कार्य करणाऱ्या पत्रकारांचे संरक्षण, आरोग्य, शिक्षण, निवारा अशा मूलभूत गजरांची पूर्तता करण्यासाठी विविध विंग्जच्या माध्यमातून कार्य सुरु असल्याचे सांगीतले. ऐंशी टक्यांपेक्षा जास्त पत्रकारांचे मासिक उत्पन्न हे पंधरा हजारांपेक्षा कमी असून त्यातून त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणून पत्रकारांसाठी एखादा जोडधंदा निर्माण करण्याकरिता स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
आमदार राजेंद्र राउत म्हणाले, पत्रकारांच्या समस्या व त्यांचे संरक्षण होण्यासाठी अशा संघटनेची गरज होती. राजकिय व्यक्ती असो वा पत्रकार त्यांना उपजिवीकेसाठी इतर जोडव्यवसाय आवश्यक असतात. पत्रकारांसाठी आपली भूमिका ही नेहमीच सहानुभुतीची राहिल. एखाद्या बातमीमुळे एखाद्याचे आयुष्य बरबाद होवू नये तसेच सामान्यांना मार्गदर्शनासाठी विविध उपक्रमांची गरज असते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कार्यालयाच्या इमारतीची फित कापून, नामफलकाचे उदघाटन व दीपप्रज्वलन करण्यात आले. उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी प्रास्ताविक केले, अपर्णा दळवी यांनी सूत्रसंचलन केले, गणेश भोळे यांनी आभार मानले.