लेडीज क्लब, धाराशिव आयोजित हिरकणी महोत्सवात सहभागी झालेल्या १६१ स्टॉल मधून लाखो रुपयांची उलाढाल झाली असून सलग ६ दिवस चाललेल्या या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी हिरकणी पुरस्काराचे वितरण आ. राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांना बोलते करत त्यांच्या यशाची कहाणी उपस्थित सर्वांना ऐकवली. त्यावेळी पुरस्कार्थी महिला आणि ऐकणाऱ्या महिला दोन्ही या यशाने भारावून गेल्या होत्या. उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट खप, आणि उत्कृष्ट विक्री कौशल्य या निकषावर आधारित ठेवलेल्या हिरकणी पुरस्कारांमधून सर्वाधिक खप झालेल्या ‘निलंगा राईस’ या स्टॉलच्या अश्विनी कोळगे आणि सर्वाधिक साड्यांची विक्री करून एक लाखापेक्षा जास्त व्यवसाय करणाऱ्या अणदूर येथील स्वप्ना सारडे या दोघींना हिरकणी पुरस्कार विभागून देण्यात आला. सन्मानचिन्ह, पैठणी सह पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी विशेष उल्लेखनीय ‘हिरकणी पुरस्कार’ या महोत्सवात दररोज अप्रतिम रांगोळी काढणाऱ्या अश्विनी उंबरे यांना देण्यात आला.
उत्कृष्ट मांडणीसाठीचा पुरस्कार काटी ता.तुळजापूर येथील श्री. कुंभार यांना देण्यात आला. त्यांनी विविध मुर्त्या, वारकऱ्यांचा संच याची सुबक मांडणी केली होती. ६ दिवसात त्यांचा जवळपास ६० हजारापेक्षा जास्त झाला. गव्हाचे बिस्किट करणाऱ्या सौ.मनीषा एखंडे, तसेच मासवडी, मोमोस बनविणाऱ्या पूनम कोकाटे यांनाही उत्तम विक्री कौशल्याचे हिरकणी पुरस्कार देण्यात आले. तसेच खणाचे परकर, पोलके विकणाऱ्या कनगरा येथील पाकीजा शेख, खारीक पावडर, अळीव लाडू, लिंपण आर्ट व पेंटिंग करणाऱ्या दिपाली पंडित यांनाही उत्तम विक्री कौशल्य हे हिरकणी पुरस्कार देण्यात आले. तसेच रंजना केजकर, मंगल गवळी यांनाही हिरकणी पुरस्काराने गौरवण्यात आले.
पुरस्कार वितरण करताना लेडीज क्लबच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, हिरकणी महोत्सवातून एक गोष्ट लक्षात आली की, महिलांमध्ये उत्तम विक्री कौशल्य असून ग्राहकांना आपल्या वस्तूकडे खेचण्याची ताकद सुद्धा महिलांमध्येच आहे. त्यामुळे हिरकणी महोत्सवात सहभागी झालेल्या सर्वच महिलांना सीएमईजीपी व पीएमईजीपी या योजनेमधून कर्ज मंजूर करण्यास आपण प्रयत्न करू.
यावेळी बोलताना आ. राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की, हा महोत्सव अत्यंत घरगुती स्वरूपात वाटला. कारण यामध्ये माता- भगिनी उत्स्फूर्त सहभागी झाल्या होत्या. महिलांची आर्थिक सक्षमतेकडची वाटचाल समाधारक असून महिलांनी यासाठी खूप मोठे कष्ट आणि त्रास घेतलेला आहे. पंतप्रधान मोदी साहेबांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या असून त्या योजना माता भगिनींपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. येणाऱ्या आगामी काळात धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार असून हे काम एकट्याचे नसून सर्वांनी प्रयत्न करावा असेही त्यांनी आवाहन केले.
शेवटच्या दिवशी झालेल्या हिरकणी महोत्सवात ‘लग्न पाहावे करून’ हा मुलाखतीवर आधारित कार्यक्रम झाला. अनुरूप विवाह संस्थेच्या डॉ. गौरी कानिटकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि अनेकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली.